गणपतीपुळे किनारी होणार कासवांचे संवर्धन.

0
30

रत्नागिरी:- गणपतीपुळे येथील रमणीय किनार्‍यावर सागरी कासवांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे काम कांदळवन विभागाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. श्री गणेश मंदिराच्या नजीकच कासवांच्या अंड्यांसाठी संवर्धन केंद्र उभारण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 16 किनार्‍यांवर सागरी संरक्षण व संवर्धन हा उपक्रम कांदळवन विभागाच्यावतीने हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी कासवमित्रांची निवड करण्यात आली असून, गणपतीपुळेसाठी ऋषिकेश जोशी कासवमित्र म्हणून काम करणार आहेत. मालगुंडसाठी आदित्य मयेकर कासवमित्र म्हणून काम करणार आहेत. यापूर्वी हे काम वनविभागाच्या प्रादेशिक विभागाकडे होते; मात्र, त्यानंतर आता सागरी कासवांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे काम कांदळवन विभागाकडे देण्यात आले आहे.

गणपतीपुळे येथे उभारण्यात आलेल्या या केंद्रात सागरी कासवांची अंडी ठेवली जाणार आहेत. 45 ते 55 दिवसात अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. ही पिल्ले समुद्रापासून 15 ते 20 मीटर अंतरावर सोडली जातात. यानंतर ती समुद्राच्या दिशेने चालत जातात, अशी माहिती कांदळवन विभागाची वनपरिक्षेत्राधिकारी ठाकूर यांनी दिली. हिवाळ्यात डिसेंबर ते पुढे चार महिने कासवांचा अंडी देण्याचा हंगाम असतो. भटकी कुत्री आणि काही वेळेस मानवांकडूनही या अंड्यांचे नुकसान होते. या अंड्यांना सुरक्षितता लाभावी यासाठी संवर्धन केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे कासवांची पिल्ले तयार होऊन त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here