कुर्धेंतील पाणी योजनेचे काम ठप्प.

0
24

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे गावासाठी केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत दीड कोटींची नळपाणी योजना मंजूर केली आहे; मात्र ठेकेदारासह ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे या योजनेचे काम सहा महिने ठप्प आहे. त्यामुळे २४ तास पाण्याचे ग्रामस्थांचे स्वप्न अपूर्णच आहे. योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे येथील परिसर धोकादायक बनला आहे. त्यामुळे योजनेचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कुर्धे गावातील कातळसडा, बंडबेवाडी, खोताची वाडी या भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत होती. या गावांकरिता नळपाणी योजना केंद्र शासनाच्या जलजीवन कार्यक्रमांतर्गत मंजूर झाली होती. दोन वर्षांपूर्वी खांबतळे येथे दोन विंधन विहिरी पाडण्यात आल्या. त्यानंतर योजनेतून प्रत्येक घरामध्ये पाणी देण्यासाठी कातळ परिसरात पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू झाले तसेच एक पाण्याची टाकीही बांधण्यात आली. काम युद्धपातळीवर सुरू होते. ठेकेदाराने अनेक ठिकाणी पाईपलाईनसाठी माती टाकून ठेवली आहे; मात्र काही ठिकाणी पाईपलाईनकरिता खोदलेले खड्डे अद्यापही न बुजवल्यामुळे पावसाळ्यात त्यात पाणी साचून राहिले होते.

खड्ड्यांमुळे हा परिसर धोकादायक बनला आहे. या संदर्भात वारंवार तक्रार देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ग्रामपंचायतीकडूनही ठेकेदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही तसेच खड्ड्यांमुळे हा परिसर अपघातक्षेत्र बनला आहे. गेले वर्षभर संबंधित ठेकेदाराने काम अर्धवट ठेवलेले आहे. नळपाणी योजनेचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यात विंधन विहिरींची खोदाई पूर्ण झाली असून, टाकीकडे जाणारी पाईपलाईन तशीच ठेवण्यात आली आहे. खड्ड्यांमध्ये पाईप तसेच ठेवण्यात आले आहेत. ही केंद्र शासनाची योजना असून २०२४ पर्यंत पूर्ण करावयाची होती; परंतु ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे हे काम अर्धवट राहणार आहे. या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी कुर्धेमध्ये जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here