लोकमान्य टिळक स्मारकाच्या संग्रहालयाला रामभाऊ साठे यांचे नाव देणार.

0
28

आज सकाळी तैलचित्र स्वीकार समारंभ.

चिपळूण:- रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणक्षेत्रात स्वतःचे आगळे स्थान निर्माण करणाऱ्या रामभाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांच्या महत्वपूर्ण कार्याच्या गौरवार्थ चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने संग्रहालयाला कै. रामभाऊ साठे यांचे नाव देण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. या संग्रहालयात रामभाऊ साठे यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. संग्रहालयाची उभारणी आणि नामकरण याची पहिली पायरी म्हणून रामभाऊ साठे यांच्या तैलचित्राचा स्वीकार समारंभ आज रविवारी ८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

रविवारी सकाळी ११ वाजता मालघर येथे हा समारंभ आनंदभुवन, ब्राह्मणवाडी- मालघर येथे होणार असल्याची माहिती लोकमान्य टिळक स्मारकाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांनी दिली. वाचनमंदिराने कोकणाला अभिमानास्पद असे संग्रहालय निर्माण केले आहे. महापुरात या संग्रहालयाला तडाखा बसला. त्यानंतर त्याची पुन्हा जोमाने उभारणी करण्यात येणार आहे. हे संग्रहालय उभारण्यात रामभाऊ साठे यांच्या कुटुंबाने मोठे योगदान दिले आहे. या संग्रहालयाला रामभाऊ साठे (मालघर) संग्रहालय असे नाव देण्याचा निर्णय वाचनमंदिराने घेतला आहे.

रामभाऊ साठे यांनी (कै.) तात्या नातू यांच्या हाकेला ओ देत कोकणात येऊन अनेक शाळा उभारण्यात मोलाची कामगिरी केली होती. रामपूर येथील मिलिंद हायस्कूलचे ते मुख्याध्यापक होते. निवृत्तीनंतर मालघर गावी स्वतःची सगळी पुंजी खर्च करून गुरूकुल ही माध्यमिक शाळा उभारली होती. विशेष म्हणजे निवृत्तीनंतरही तीस वर्षे अत्यंत निष्ठेने ते या शाळेत शिकवत होते. साठे यांच्यासारख्या बहुपेडी व्यक्तीमत्त्वाच्या हाडाच्या शिक्षकाचे नाव संग्रहालयाला देण्याचा निर्णय घेऊन शिक्षक या मुल्याचा सन्मान करण्याचे औचित्य लोटिस्माने साधले आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षातच संग्रहालय पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा आहे. संग्रहालयात लावावयाच्या तैलचित्राचा स्वीकार समारंभ करून उद्या एकप्रकारे संग्रहालय उभारणाचे एक पाऊल आणखी पुढे पडत आहे. या कार्यक्रमाला आजूबाजूच्या पंचक्रोशीतील तसेच चिपळुणातील शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमान्य टिळक स्मारकाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here