मिऱ्या बंधाऱ्याचे काम अखेर सुरू होणार.

0
34

रत्नागिरी:- अपूर्ण राहिलेल्या मिऱ्या बंधाऱ्याच्या सुमारे बाराशे मीटरच्या टप्प्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे; परंतु ठेकेदाराने एकाच मशिनद्वारे बंधाऱ्याचे काम सुरू केले आहे. अतिशय कूर्मगतीने हे काम सुरू आहे. कामाला गती मिळावी तसेच अपेक्षित वजनाचे दगड टाकण्यात यावेत यासाठी पत्तन विभागाने पुन्हा एकदा ठेकेदाराशी चर्चा करून कामाचा वेग वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे साडेतीन किमीचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. यापैकी बाराशे मीटरचे काम अजून अपूर्ण आहे. पत्तन विभागाने केलेल्या सर्व्हेमधील ७ डेंजर झोनपैकी एक वगळता सर्व टप्प्यांचे काम झाले आहे; परंतु पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा टप्पा शिल्लक आहे. या टप्प्याचे काम करताना यंत्रसामुग्रीची ने-आण करण्यासाठी लागणाऱ्या जागेवरून वाद निर्माण झाला. जागामालकाने याला विरोध केल्यामुळे काम रखडले होते. हे काम व्हावे यासाठी स्थानिकांनी पत्तन विभागाला निवेदनही दिले.

पावसाळा संपल्यानंतरही अपूर्ण असलेले हे बाराशे मीटरचे काम सुरू झाले नव्हते. याबाबत पत्तन विभागाने ठेकेदाराची बैठक घेऊन त्याला काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. आदेशानंतरही दोन आठवडे विलंबाने ठेकेदाराने बंधाऱ्याचे काम सुरू केले खरे; परंतु ते कासवाच्या गतीने सुरू आहे. एकाच मशिनद्वारे बंधाऱ्याच्या कामाला सुरवात केली आहे. जे दगड टाकण्यात येत आहेत ते देखील कमी वजनाचे असल्याचे पत्तन विभागाने ठेकेदाराला ताकीद दिली आहे. लवकरात लवकर बंधाऱ्याच्या कामाची गती वाढवावी, असे आदेश देण्यात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here