रत्नागिरी:- छोट्या छोट्या दैनंदिन गोष्टींकडे बघण्याचा विनोदी दृष्टिकोन, हास्यातून सामाजिक विषयांवर टिपण्णी, गंमतीदार किस्से आणि ते सादर करण्याची खास नायगावकरी शैली अशी अनोखी मैफल काल (२७ डिसेंबर) “नवनिर्माण”मध्ये रंगली आणि कै. मोहन खातू क्रीडा संकुलात हास्याचे फवारे उडाले. निमित्त होते ते नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय आणि नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाच्या इंद्रधनु युवा महोत्सवाचे. ज्येष्ठ साहित्यिक, हास्य कवी अशोक नायगावकर हे या महोत्सवानिमित्त रत्नागिरीत आले होते. त्यावेळी त्यांनी रोजच्या घडामोडी, किस्से विनोदी शैलीतून सादर केल्या आणि उपस्थित सर्वांनाच आपले हसू अडवणे कठीण झाले.
कवी म्हणजे तरल, हळुवार मनाचा अशी साधारण कल्पना असते, मात्र आमच्या बाबतीत हळू केलेला वार असे म्हटले जाते. कवी म्हणजे तुझ्या गळा, माझ्या गळा असे काहीतरी लिहिणारा, पण आजची परिस्थिती तुझा गळा धरू की माझा गळा अशी आहे, असे नायगावकर यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. अनेक विनोद किस्से ऐकवतानाच त्यांनी पुण्या-मुंबई प्रदूषणाचे साम्राज्य असताना रत्नागिरीला मात्र एका बाजूला सह्याद्री आणि दुसरीकडे समुद्र असल्यामुळे चांगल्या वातावरणाचा आनंद लुटत असल्यामुळे तुम्ही सर्व भाग्यवान असल्याचे सांगितले.
त्यामुळे पुढे (शिक्षणानंतर) मुंबईत गेला तरी इथला रसाळ आंबा तुम्हाला इकडे बोलवतच राहील, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी चौपाटीवरील टिळकांच्या पुतळ्याशी झालेला संवादाचे उत्तम सादरीकरण केले. महिलांच्या गौरवपर “माय” आणि “मिळवती” या दोन कविता सादर करताना भारताची ताकद ही कोणतेही मिसाईल, शास्त्र नसून एकत्र कुटुंब पद्धती आहे आणि त्याचे श्रेय महिलांना जाते, असे सांगितले. तर आपल्या मिश्किलशैलीत भाज्यांची आत्मकथा ही व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांनी मनोगत व्यक्त करून शिक्षण संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि मराठी भाषा चळवळीतले कार्यकर्ते रजनीश राणे, महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. ताराचंद ढोबळे, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, कनिष्ठ महाविद्यालयाची जीएस सलोनी राजीवले, जीएस अमान बारगीर उपस्थित होते.