रत्नागिरी:- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र (विभाग रत्नागिरी) संस्थेच्या माध्यमातून सावरकर नाट्यगृह येथे सरकारी नोकरीचा महामेळावा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. निलेश सांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. जिजाऊ संघटनेचे जिल्हा प्रमुख प्रथमेश गावणकर, कायदेशीर सल्लागार अॅड. महेंद्र मांडवकर, सचिव केदार चव्हाण, नंदकुमार मोहिते, सुजित कोलते, वारीक, मधुकर थुल, विजय मोहिते, सुजित वाळके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मार्गदर्शन कार्यशाळेतील सर्वात पहिले सत्र हे गणिताचे जादूगार अशी ज्यांची महाराष्ट्रात ख्याती आहे असे तज्ञ शिक्षक तसेच गणित विषयाच्या पुस्तकाचे लेखक खेमचंद्र पाटील यांचे झाले. गणित या विषयाबद्दल असणारी भीती वेगवेगळ्या गणिताच्या ‘ट्रिक’ व उदाहरणे देऊन कमी केली. लाईव्ह स्क्रीनवर प्रश्नमंजुषा घेऊन मुलांचा आत्मविश्वास देखील वाढविला व विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देखील दिली. दुसरे सत्र हे २०११ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत झालेल्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेले व जिजाऊचे तज्ञ मार्गदर्शक संतोष आंबटकर यांनी स्पर्धा परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली, स्पर्धा परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात याचे यथार्थ वर्णन करत स्पर्धा परीक्षेची माहिती दिली.
यानंतर जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांनी उपस्थित असलेल्या हजारोंच्या संख्येने उपस्थित युवा वर्गांच्या मनाचा ठाव घेतला. सर्वांचे स्वागत करत प्रत्येक ठिकाणी जिजाऊ आपल्या पाठीशी असेल रत्नागिरी करांसाठी मी माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत सोबत असेन असा विश्वास दिला. महाराष्ट्राचे प्रेरणादायी वक्ते नितीन बानगुडे पाटील यांनी सभागृहाचा ताबा घेत आपल्या ओघवत्या वाणीने हजारों तरुणांच्या मनातील मळभट, गैरसमज व न्यूनगंड दूर करण्याचा खास प्रयत्न केला. अत्यंत प्रेरणादायी, मार्गदर्शक व समर्पक असे अनेक दाखले दिले. तब्बल सव्वा तास नितीन बानगुडे पाटलांच्या आवाजाने सभागृह दणाणून सोडले होते.
यादरम्यान जिजाऊ संस्थेच्या दोन पदाढीकाऱ्यांच्या नियुक्त्या घोषित करण्यात आल्या व निलेश सांबरे यांच्या हस्ते मंदार नैकर यांना रत्नागिरी तालुकाध्यक्ष व अक्षय बारगुडे यांना रत्नागिरी युवा तालुकाध्यक्ष या पदांची जबाबदारी देत त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाची प्रस्तावना जिजाऊचे सचिव केदार चव्हाण यांनी केली तर सूत्रसंचालन हे अमर राऊत यांनी आपल्या विशेष शैलीत केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हे जिजाऊचे प्रकल्प संचालक संदीप पाटील यांनी केले. रत्नागिरी मध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी, युवक, युवती हे गाव खेड्यांमधून वाड्या-वस्त्यांमधून उपस्थित राहिले विशेष म्हणजे शिक्षक व समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांची खास उपस्थिती या कार्यक्रमाला लागली.
२००० हून अधिक लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. अगदी सभागृहाच्या बाहेरील बाजूस देखील एलईडी वॉल लावून तिथे बैठक व्यवस्था करून सुद्धा हॉलमध्ये उभे राहण्यासही जागा नव्हती. विशेष म्हणजे विचार मंचावर दोन्ही बाजूला तसेच मागच्या बाजूस देखील विद्यार्थी-विद्यार्थिनी बसलेले होते, असे हे अद्भुत दृश्य रत्नागिरीकरांनी ६ ऑक्टोबरच्या प्रेरणादायी कार्यक्रमात अनुभवले.