कोकणात १८ उमेदवार रिंगणात उतरवणार : जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे.
रत्नागिरी:- पालघर ते अगदी रत्नागिरीसह तळकोकणात काम करणार्या जिजाऊ या शैक्षणिक व सामाजिक संस्थेने येणार्या विधानसभेच्या रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालघर, भिवंडी येथील सर्वा जागांवर उमेदवार उभे करण्याबरोबरच रत्नागिरी आणि राजापूर-लांजा-संगमेश्वर या विधानसभा मतदार संघात एकूण १८ उमेदवार उभे करत असल्याची घोषणा या संस्थाचे संस्थापक नीलेश सांबरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्यावतीने रत्नागिरी विभागात जिल्ह्यातील युवक आणि युवतींसाठी सरकारी नोकरी मार्गदर्शन महामेळावा रविवारी येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सांबरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिजाऊ देखील संपूर्ण कोकणात तयारीनिशी उतरणार आहे. त्यासाठी या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी चांगले उमेदवार प्राप्त झालेले आहेत. जे उच्च शिक्षित आहेत. ज्यांच्या अंगाला भ्रष्टाचाराचा डाग नाही, असे सर्व उमेदवार असतील. सर्वसामान्यातील गोरगरीब विद्यार्थी राजकारण आणि प्रशासनात आला पाहिजे, महिलांना न्याय हक्क मिळायला हवा, यासाठी ही लढाई सुरू आहे.
विधानसभेसाठी कोकणात पालघरमधील सर्व विधानसभा जागांवर, भिवंडीतील सर्व विधानसभा जागांवर उमेदवार उभे केले जाणार आहेत. त्याचबरोबर ठाणे शहर व मुंब्रा, श्रीरामपूर, साखरी आदी जागांवर देखील उमेदवार उभे करणार आहोत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ आणि राजापूर-लांजा-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ येथेही उमेदवार उभे केले जाणार असल्याचे नीलेश सांबरे यांनी सांगितले. संपूर्ण कोकणातील पाच जिल्ह़्यात १८ उमेदवार या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात येत आहेत. आणखी काही जागांवर जे उमेदवार चांगले आणि ज्यांना समाजात काम करण्याची स्वप्न आहेत, जे नोकरी-व्यवसाय करून समाजासाठी वेळ देतात, त्यांना या निवडणुकीसाठी उभे करणार असल्याचे सांबरे यांनी सांगितले.