संगमेश्वर:- तालुक्यातील जि. प. पू. प्राथ. शाळा पिरंदवणे नं. १ शाळेत ‘संविधान दिन’ समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी सामूहिकपणे संविधानाचे प्रास्ताविक म्हणून पुष्प अर्पण करत अभिवादन केले.
यावेळी मुख्याध्यापक श्री. संतोष चव्हाण यांनी संविधानकर्त्यांचा व्यापक दृष्टिकोन आणि त्यामागे भारतातील विविधतेत असणाऱ्या एकतेचा गौरवपूर्ण उल्लेख करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारत हे एक राष्ट्र म्हणून सार्वभौम असण्यामध्ये भारतीय राज्यघटनेचे महत्त्व त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत उलगडून सांगितले. यानंतर विद्यार्थ्यांनी संविधान प्रभातफेरी काढली. भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या.
आजच्याच दिवशी २००८ साली मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याबाबत बोलताना शाळेतील उपशिक्षक श्री. सचिन इंगळे यांनी ‘आपण यांच्यासमान राष्ट्रभक्त व्हावे यासाठी प्रत्येक वर्षी या वीरांची आठवण भारतवासी काढतात’ असे प्रतिपादन केले. भारतीय जवानांचे धैर्य, त्याग आणि पराक्रम आपणा सर्वांना नेहमीच प्रेरणादायी असेल असेही त्यांनी नमूद केले.