रत्नागिरी पंचायत समितीतील शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर दोन दिवसात कारवाई.

0
13

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकार्‍याबाबत आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. याची गंभीर दखल आम्ही घेतली आहे. कारवाईला विलंब का झाला, या खोलात जाण्यापेक्षा येत्या शुक्रवारी संबंधित शिक्षण विस्तार अधिकार्‍यावर कारवाई केली जाईल. त्यांना पाठिशी घालणार्‍या शिक्षण अधिकार्‍याचीही चौकशी होईल, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी पंचायत समितीमध्ये हा विस्तार अधिकारी कार्यरत आहे. सध्या त्याच्याकडे शहराचासुद्धा पदभार आहे. तीन महिन्यांपूर्वी रत्नागिरी तालुक्यातील एका शाळेतील मुख्याध्यापिकेला या विस्तार अधिकार्‍याच्या गैरवर्तनाला सामोरे जावे लागले होते. याबाबत त्या मुख्याध्यापिकेने या अधिकार्‍याविरोधात २४ सप्टेंबरला जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार केली होती. त्यामध्ये या महिला शिक्षिकेने तो शिक्षण विस्तार अधिकारी अपमानकारक व मनात लज्जा होईल, असे वर्तन करत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. यानंतर ११ ऑक्टोबरला पुन्हा शहरातील एका शाळेतील शिक्षिकेने प्रेमाच्या गोष्टी बोलण्यास नकार दिल्याने तो शिक्षण विस्तार अधिकारी त्रास देत असल्याची तक्रार केली होती.

त्यानंतर सोशल मीडियावर या शिक्षण विस्तार अधिकार्‍याचा एक फाेटो प्रचंड व्हायरल झाला. शहरातील एका शाळेत एका शिक्षिकेला केक भरवत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. दोन महिलांनी रितसर तक्रार देऊनसुद्धा जिल्हा परिषद प्रशासनाने मात्र या विस्तार अधिकार्यावर कोणतीच कारवाई केली नाही. गणवेशाचा ठेका देखील या शिक्षकाने घेतला होता.

अन्य काही तक्रारी त्यांच्या विरोधात असल्याचे पत्रकार परिषदेत महिला आरोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर सौ. चाकणकर म्हणाल्या, माझ्याकडे याबाबतच्या तक्रारी आल्या आहेत. आम्ही याची गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी गुरुवारी याबाबत बैठक बोलावणार असून शुक्रवारी संबंधित पाटील नामक शिक्षण विस्तार अधिकार्‍यावर कारवाई केली जाईल. या कारवाईला एवढा विलंब का झाला, याबाबत शिक्षण अधिकार्‍यांची चौकशी केली जाईल. त्यामुळे महिलांशी असे वर्तन करणार्या अधिकार्‍याची गय केली जाणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here