कॉँग्रेस मध्ये केला प्रवेश!
गुहागर:- गुहागर मतदारसंघात भास्कर जाधव यांच्या विरोधात एक वर्षांपूर्वी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ज्यांच्या नावाची घोषणा केली होती त्या सहदेव बेटकर (Sahdev Betkar) यांनी शिवसेनेचे धनुष्य खाली ठेवत काँग्रेसच्या हातात ‘हात’ मिळवला आहे. आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये रीतसर प्रवेश केला. मुंबई येथे हा पक्षप्रवेश झाला
सहदेव बेटकर हे कुणबी समाजाचे नेते आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीतही (Vidhansabha Election) त्यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघातून आमदार. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. प्रचारासाठी त्यांना अवघ्या काही दिवसांचा अवधी मिळाला होता. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला मात्र त्यांना मिळालेली मते लक्षणीय होती. दोन वर्षांपूर्वी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena – Eknath Shinde) प्रवेश केला होता. यानंतर एका जाहीर मेळाव्यात भास्कर जाधव यांच्या विरोधात पुन्हा बेटकर यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणणारच अशी घोषणा रामदास कदम यांनी केली होती. पण मध्येच काहीतरी बिनसले आणि बेटकर उमेदवारीच्या शर्यतीतून बाजूला झाले
मधल्या काळात ते इतर पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा सुरू होत्या. अखेरीस आज ती चर्चा सत्यात उतरली. बेटकर आता ‘ऍक्टिव्ह’ झाले असून जिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, इतर पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्या सोबतीने काँग्रेसला रत्नागिरी जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा शब्द प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांनी दिला आहे. त्यासोबतच भविष्यात चिपळूणमध्ये पक्षाचा मोठा मेळावा घेण्याचा बेटकर यांचा निश्चय आहे