राजापूर:- राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी हे ठाकरे गटाचे आमदार असून त्यांना यावेळी किरण उर्फ भैय्या सामंत यांचे आव्हान असणार आहे. श्री. सामंत हे राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधु असून ते कायमच आपल्या भावासाठी ‘किंगमेकर’ च्या भूमिकेत राहिले आहेत. परंतु यावेळेस ते विधानसभेला स्वतःला आजमावतील अशी परिस्थिती आहे. आ. राजन साळवी यांना यावेळेस सलग १५ वर्षे आमदार असल्याने ‘अॅंटीइन्कमबंसी’ चा सामना करावा लागणार आहे. तसेच शिवसेनेचे निष्ठावंत राहिल्याने जुन्या जाणत्या कट्टर शिवसैनिकांची साथ त्यांना असणार आहे.
किरण सामंत यांनी मतदारसंघात अनेक पक्षप्रवेश केले असल्याने व बंधु पालकमंत्री असल्याने निधी वाटपाच्या घोषणांमुळे वातावरण निर्मिती करण्यात ते यशस्वी राहिले आहेत. आर्थिक बाजू मजबूत असल्याने मतदारसंघात कार्यक्रम राबवविणे त्यांना आणखी सोपे पडत आहे. तसेच सत्ता असल्याने प्रशासनामार्फत ते स्थानिक कार्यकर्त्यांची कामे करत आहेत. त्यांच्या सुकन्या अपूर्वा सामंत या देखील मतदारसंघात लक्ष घालून कार्यक्रम घेत असतात तसेच कार्यकर्त्यांच्या संपर्कात असताना दिसत असून दुसऱ्या बाजूला आ. राजन साळवी यांचे पुतणे दुर्गेश साळवी व सुपुत्र अथर्व साळवी तसेच साळवी कुटुंबियांतले सदस्य विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारसंघात फिरताना दिसत असतात. आमदार. राजन साळवी यांचा पराभव करणे तिन्ही भविष्यात होऊ शकणाऱ्या उमेदवारांना सोपे असणार नाही.

या मतदारसंघात अजित पवार गटाचे अजित यशवंतराव व कॉँग्रेसचे अविनाश लाड हे इच्छुक आहेत. गेल्या निवडणुकीत अविनाश लाड यांनी राजन साळवी यांना चांगली टक्कर दिली होती. गेल्या निवडणुकीत बराचसा कुणबी समाज हा अविनाश लाड यांच्या बाजूने उभा राहिला होता. परंतु यावेळेस अनेक कुणबी समाजातील कार्यकर्ते आ. राजन साळवी आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अविनाश लाड देखील मतदारसंघातून निवडणुक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या गावभेटीचे कार्यक्रम होत आहेत व आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन ते तळागाळात फिरताना दिसत आहेत. युवा कार्यकर्ते त्यांच्यासोबत जोडले जात आहेत. अजित पवार गटाचे अजित यशवंतराव हे देखील निवडणुक लढवायच्या मनस्थितीत आहेत. अशात ही निवडणुक तिहेरी होऊ शकते.