मुंबई: लक्ष्मण उतेकर यांच्या ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’च्या ट्रेलरवर नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवणे आणि संवादांमधून ‘हिंदवी’ स्वराज्याचा उल्लेख गाळल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून ट्रेलरमधील काही दृश्यांवर प्रेक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे. संभाजी राजांसारख्या शूर योद्ध्याला नृत्य करताना दाखवणे ही त्यांची प्रतिमा कमजोर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काही प्रेक्षकांनी केला आहे.
संवादातील “हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा” या ऐतिहासिक वाक्याला गाळून “हे राज्य व्हावे” असे दाखवल्यानेही संताप व्यक्त होत आहे. नेटिझन्सनी हा उल्लेख काढणे हा इतिहासाची तोडफोड करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
चित्रपटात औरंगजेबाला ‘मुगल शाहंशाह’ असे संबोधणे अनावश्यक असल्याचे काहींचे मत आहे. औरंगजेबाला फक्त त्याच्या नावाने संबोधणे पुरेसे होते, असे नेटिझन्सनी म्हटले आहे.
संभाजी महाराजांच्या (Sambhaji Maharaj) राज्याभिषेक प्रसंगाचाही ट्रेलरमध्ये कमी महत्त्व देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार हा सोहळा लाखो लोकांच्या उपस्थितीत पार पडला होता, परंतु ट्रेलरमध्ये त्याचे अपूर्ण व सुमार चित्रण दिसते.
या चित्रपटात ऐतिहासिक वास्तवाला फाटा देऊन मनोरंजनाच्या नावाखाली चुकीचे चित्रण केल्याचा आरोप केला जात आहे. नेटिझन्सनी या चित्रपटात सुधारणा करावी, अशी मागणी केली आहे, अन्यथा संभाजी महाराजांच्या वारशाचा योग्य सन्मान होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.