जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन सादर.
रत्नागिरी:– जिल्हा शासकीय रुग्णालयातील नागरिकांच्या सेवेशी संबंधित असलेल्या विविध तक्रारींबाबत रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष आरावकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे.

या निवेदनात त्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या असहकार वृत्तीवर, संपर्क तुटवड्यावर, तसेच डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आरावकर यांनी नमूद केले आहे की, “रुग्णांच्या सेवेसाठी आमची संघटना सातत्याने रुग्णालयातील काही जबाबदार अधिकाऱ्यांना संपर्क साधत असते, मात्र कर्मचाऱ्यांकडून फोनना प्रतिसाद मिळत नाही. हे अत्यंत गंभीर व जनतेच्या हिताविरोधी आहे.”

“आम्ही एजंट नसून लोकसेवेसाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत,” असे नमूद करत त्यांनी हेही स्पष्ट केले की माजी मंत्री आणि विद्यमान आमदार मा. सदाभाऊ खोत यांच्या निर्देशानुसारच हे प्रश्न रुग्णालय प्रशासनापर्यंत पोहोचवले जात आहेत.
तसेच, “डॉक्टरांनी राजकीय हस्तक्षेप नको म्हणणे ही लोकशाही मूल्यांची पायमल्ली आहे,” असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
आरावकर यांनी अधोरेखित केले की, रयत क्रांती संघटना ही सरकारचा घटक असून त्यांचे कार्यकर्तेही नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून जबाबदारीने काम करतात. त्यामुळे प्रशासकीय सहकार्याची अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही.
तसेच, संपर्क क्रमांक देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याबाबत संताप व्यक्त करत, “जर हे सहकार्य पुढेही मिळाले नाही तर सार्वजनिक आरोग्य खात्याकडे तक्रार सादर करण्यात येईल,” असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनाच्या अखेरीस, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे व्यक्तिशः आभार मानत, त्यांनी कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याची विनंती केली आहे.
रयत क्रांती संघटनेचे हे पाऊल जिल्हा शासकीय रुग्णालयातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी प्रसिद्ध व्यवसाईक साइनाथ नागवेकर देखील उपस्थित होते.