पुन्हा स्वगृही प्रवेश!
रत्नागिरी:- डिसेंबर २०२२ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत ग्रुप ग्रामपंचायत मावळंगे – नातुंडे मध्ये महाविकास आघाडीने इतिहास घडवत पहिल्यांदाच सरपंच आणि ५ ग्रामपंचायत सदस्य निवडून आणले. थेट सरपंच म्हणून नम्रता बिर्जे निवडून आल्या तर उपसरपंचपदी विद्याधर गोगटे यांची दोन वर्षांसाठी बिनविरोध निवड झाली. पण विद्याधर गोगटे आणि सदस्या तन्वी बोल्ये यांनी दसऱ्याच्या आदल्या दिवशी अचानक शिंदे गटात प्रवेश केल्याने गावात नाराजीचा सुर होता.
गावातील शिवसैनिकांच्या ही बाब जिव्हारी लागल्याने त्यांनी या दोघांचा मन वळविण्याचा प्रयत्न केला आणि गेली दहा बारा दिवस त्यांनी घेतलेल्या मेहनतीला अखेर यश आलं. मंगळवारी (दिनांक २२) उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे आणि युवासेना तालुकाधिकारी प्रसाद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सदस्या तन्वी बोल्ये यांनी पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आता उपसरपंच गोगटे हे सुद्धा लवकरच माघारी फिरतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यावर गावातील कार्यकर्त्यांनी व मतदारांनी आम्ही यांना पक्ष बदलण्यासाठी निवडून दिले नव्हते अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.