नवीन शैक्षणिक धोरणावर एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न.

0
46

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील वरिष्ठ महाविद्यालयांमधील प्राध्यापकांचा सहभाग.

रत्नागिरी:- नवीन शैक्षणिक धोरण-२०२० नुसार मुंबई विद्यापीठातर्फे येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात आज (३० सप्टेंबर) वाणिज्य शाखेसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापक सहभागी झाले होते.

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे प्रो व्हाइस चान्सलर डॉ. अजय भामरे, विद्यापीठाच्या कॉमर्स आणि मॅनेजमेंट फॅकल्टीच्या डीन डॉ. कविता लघाटे, विद्यापीठाच्या फायनान्स आणि अकाउंट्स विभागाचे माजी अधिकारी डॉ. रवींद्र भाम्बर्डेकर, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, संस्थेच्या सदस्या ऋतुजा हेगशेट्ये, मुंबई उपकेंद्राचे को-ऑर्डिनेटर डॉक्टर किशोर सुखटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर मनोगत व्यक्त करताना मुंबई विद्यापीठाचे प्रो व्हाइस चान्सलर डॉ. भामरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तळागाळात रुजवले त्याचाच परिणाम म्हणून त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे झाली असून सकारात्मक प्रतिक्रिया मिळत असल्याचे सांगितले. राष्ट्रीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना त्याचे काय परिणाम होणार आहेत, याबाबत अभिप्राय काय आहे, धोरण राबविताना येणाऱ्या अडचणी काय आहेत ते या कार्यशाळेच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत तसेच येणाऱ्या अडचणी संबंधितांशी बोलून सोडवून घ्या, असे आवाहन यावेळी डॉ. भामरे यांनी केले.

या सर्वाचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी असल्याचे नमूद करतानाच विद्यापीठाकडून गुणांकन करताना येणाऱ्या अडचणींचा उहापोह करून त्या येऊ नयेत म्हणून प्राध्यापक व महाविद्यालयाने काय काळजी घ्यावी याविषयी डॉ. भामरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संपूर्ण कागदपत्रे विद्यापीठापर्यंत पोहोचले की नाही याची खातर जमा करा तसेच आपल्या शंकांचे निरसन करून घ्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात विद्यापीठाचा अशाप्रकारे सेमिनार होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे नमूद करतानाच रत्नागिरीतील उपकेंद्र सक्षम व्हावे, येथील टीम वाढवली तर अनेक गोष्टी सुकर होतील, यादृष्टीने विद्यापीठाने विचार करावा अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष श्री. हेगशेट्ये यांनी केली. यावेळी प्राचार्य डॉ. जगदाळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

वाणिज्य शाखेतील अकाउंटन्सी, बिझनेस मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, मॅनेजमेंट स्टडीज, अकाउंटिंग अँड फायनान्स अँड फायनान्स मॅनेजमेंट, फायनान्शिअल मार्केट्स, बँकिंग अँड इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, ट्रेड ट्रान्सपोर्ट अँड इंडस्ट्री या विषयांच्या अभ्यासमंडळातील विषयतज्ज्ञांनी आज मार्गदर्शन केले.

दरम्यान, मंगळवारी (१ ऑक्टोबर) विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, माहिती- तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, गणित, संख्याशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान या विषयांच्या अभ्यासमंडळातील विषयतज्ज्ञ महाविद्यालयीन स्तरावरील संबंधित प्राध्यापकांना मार्गदर्शन करणार आहेत. गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात उद्घाटन होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here