सरकारी जाहिरातीविना एसटी दिसत आहेत निटनेटक्या!!

0
27

रत्नागिरी:- विधानसभा निवडणुकीमुळे लाल परी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन  महामंडळच्या एसटी बसच्या दोन्ही बाजूंना व पाठीमागे दिसून येणाऱ्या सर्व शासकीय जाहिराती गेल्या महिनाभरापासून काढून टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे राज्यातील एसटीच्या सर्वच बस सध्या जाहिरातरहित असल्यामुळे चकाचक दिसून येत आहेत.

रस्ता तेथे एसटी बस असा शासनाचा धोरण असल्याने एसटी बस ही राज्यातील  प्रत्येक गावांत व गावातील वाडीवस्त्यांपर्यंत असलेल्या रस्त्यावरून ये-जा करीत असल्याने राज्यातील प्रत्येक गावात एसटी बस दिसून येते. त्यामुळे जाहिरातींच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सहजपणे  जनतेपर्यंत पोहचवण्याचे एसटी बस या प्रभावी माध्यम ठरल्या आहेत.
         
शासकीय जाहिरातींमध्ये प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे, संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे फोटो असल्याने आचारसंहिता लागू झाल्यापासून त्या एसटीवरून काढून टाकण्यात आल्या आहेत. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणुन एसटी बसवर लावलेल्या सर्व शासकीय जाहिराती तत्काळ काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील सर्व आगारांना परिपत्रक काढून आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करण्याचे आदेश देण्यात आले होते.

आता निवडणूक जरी झाली असली  तरीही राज्यातील सर्व एसटी बस जाहिरातरहितच असल्याने खरोखरच एसटी बस ही लाल परी असल्याचे दिसून येत असले तरी काही दिवसांपुरत्याच या एसटी बस चकाचक दिसणार आहेत. कारण आता महायुतीच्या नवीन सरकारचा शपथविधी झाल्यानंतर पुन्हा राज्यातील सर्व एसटी बस शासकीय जाहिरातींनी झळकलेल्या दिसून येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here