निवडलेला मार्ग खंबीरपणे स्वीकारा : सौ. स्वप्ना यादव.

0
26
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्या सौ. स्वप्ना यादव.

“नवनिर्माण”च्या इंद्रधनु युवा महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन.

रत्नागिरी:- आपण घेतलेले शिक्षण आणि आपण निवडलेले क्षेत्र काहीवेळा वेगळे असू शकते. अशावेळी आपला मार्ग निवडताना गडबडून न जाता जो मार्ग निवडला आहे तो खंबीरपणे स्वीकारला पाहिजे. त्यासाठी आपल्या डोळ्यासमोर एखादा चांगला आदर्श ठेवला पाहिजे. त्यामुळे आपली त्या मार्गावरची वाटचाल अधिक सुकर होते, असा सल्ला चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी दिला.

नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करताना चेअरमन अभिजीत हेगशेट्ये.

नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय आणि नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय इंद्रधनु युवा महोत्सवाचे आज (२७ डिसेंबर) जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. सौ. यादव म्हणाल्या, सहज रोजगार कसा उपलब्ध होईल याचा विचार करून सुभाषराव चव्हाण यांनी चिपळूण नागरी पतसंस्थेचे रोपटे लावले. आज हेच रोपटे ५० शाखांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात पसरले आहे, याचा मला अभिमान वाटतो. विज्ञानाचे शिक्षण घेऊनही गेली ३० वर्ष मी बँकिंग क्षेत्रात उत्तमरित्या कार्यरत आहे.

त्यामुळे आपण घेतलेल्या शिक्षणाचा वापर करून त्याचा आपण निवडलेल्या क्षेत्रात कसा वापर करता येईल याचा विचार करता आला पाहिजे.
संस्थेचे चेअरमन श्री. हेगशेट्ये यांनी नवनिर्माण ही केवळ शिक्षण संस्था नसून याकडे चळवळ म्हणून पाहत असल्याचे नमूद केले. परिसरातील एकही मुलगा, मुलगी आर्थिक परिस्थितीअभावी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी “नवनिर्माण” सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच झी एंटरटेनमेंटचे माजी अध्यक्ष नितीन वैद्य यांच्या सूचनेनुसार भविष्यात “परफॉर्मिंग आर्ट” हा विभाग शिक्षण संस्थेत सुरू करणार असल्याचे सूतोवाच केले.

इंद्रधन युवा महोत्सवाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव. शेजारी मान्यवर.

संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. परकार यांनी इंद्रधनुसारख्या युवा महोत्सवांमधूनच उद्याचा कलाकार, लेखक, साहित्यिक, उद्योजक घडत असल्याचे सांगितले. संधीचा उपयोग जितक्या चांगल्या पद्धतीने कराल तितक्या उत्तम पद्धतीने तुम्ही भविष्यात घडाल. कलागुण जोपासणे आणि ते कसे वृद्धिंगत होईल हे पाहणे प्रत्येकाच्या हातात आहे. त्यामुळे संधीचा फायदा घ्या आणि मनस्वी आनंद लुटा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी व्यासपीठावर नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, उपाध्यक्ष डॉ. अलीमिया परकार, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंदार गीते, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. आशा जगदाळे, नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. ताराचंद ढोबाळे, कनिष्ठ महाविद्यालयाची जीएस सलोनी राजीवले, वरिष्ठ महाविद्यालयाचा जीएस अमान बारगीर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयात घेण्यात आलेल्या क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध प्रकारात प्रथम तीन क्रमांक विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जगदाळे यांनी केले. सूत्रसंचालन अद्वैत शेट्ये या विद्यार्थ्याने केले. आभार जीएस अमान बारगीर याने मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here