रत्नागिरी:- मागील काही वर्षापासून जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यावर मात करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून पाण्याचा वापर कमी करण्यासाठी व भविष्यातील टंचाई कमी करण्यासाठी जलसाक्षरतेची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी केले.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद आणि मुख्य संसाधन केंद्र, जे. पी. एस. फाउंडेशनतर्फे रत्नागिरीतील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. या शिबिराचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, प्रकल्प संचालक राहुल देसाई, प्रकल्प संचालक श्रीकांत हावळे, कार्यकारी अभियंता मयुरी पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पुजार म्हणाले, अनमोल पाण्याचे मूल्य समजून घेण्यासाठी जलसाक्षरतेची गरज आहे. योग्य विशेषतः जेव्हा जलस्रोत समजून घेणे, व्यवस्थापित करणे आणि वापरणे या बाबी येतात तेव्हा शिक्षण अधिक महत्वाचे बनते. या शिबिरात सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता महेश आरळेकर, आष्टा महाविद्यालयातील प्रा. पांडुरंग पिसाळ, वॉटर फिल्ड टेक्नोलॉजीचे सल्लागार अनिरूद्ध पळणीकर, हर्षदा वाळके, गोविंद भारद्वाज, वैष्णवी गुरव, सुनील आडके आदींनी मार्गदर्शन केले.