नवी दिल्ली | २ जुलै २०२५
कोविड-१९ लसीकरणानंतर काही युवकांमध्ये अचानक मृत्यू झाल्याच्या काही घटनांनंतर जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, यावर केंद्र सरकारने मोठं स्पष्टीकरण दिलं आहे. ICMR (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद), NCDC (राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र) आणि AIIMS (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) या प्रमुख संस्थांनी संयुक्तपणे केलेल्या अभ्यासात स्पष्ट करण्यात आलं आहे की, कोविड लसीकरण आणि हृदयविकारासारख्या अचानक होणाऱ्या मृत्यूमध्ये कोणताही थेट संबंध आढळलेला नाही.
या अभ्यासात १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींवर विशेष लक्ष देण्यात आलं. यात दिसून आलं की, अचानक मृत्यू होणाऱ्या रुग्णांमध्ये लसीकरण न केलेल्यांचाही मोठा हिस्सा होता. त्यामुळे लसीमुळे अशा घटनांचा धोका वाढतो, हा दावा चुकीचा असल्याचं स्पष्ट केलं आहे.
आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना आवाहन केलं आहे की, कोविड लसीकरणाबाबत चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि आवश्यक असलेली बूस्टर डोस देखील अवश्य घ्या.