जागतिक उच्च रक्तदाब दिन २०२५! ‘सायलेंट किलर’वर विजय मिळवूया!

0
19

लेखन:- डॉ. यश प्रसादे, NCD (Non Communicable Diseases) विभाग समन्वयक, रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय.

प्रत्येक वर्षी १७ मे रोजी जागतिक उच्च रक्तदाब दिन (World Hypertension Day) साजरा केला जातो. या दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे समाजात ‘उच्च रक्तदाब’ या गंभीर परंतु बहुतेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या आजाराविषयी जनजागृती करणे. ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखला जाणारा हा आजार अनेकदा कोणतीही लक्षणे न देता शरीरात हळूहळू नुकसान करत जातो. वेळेवर निदान व उपचार न झाल्यास, हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणे, मेंदूवर परिणाम होणे, डोळ्यांचे नुकसान होणे यांसारख्या गंभीर स्थिती उद्भवू शकतात.

२०२५ ची थीम ‘तुमचा रक्तदाब अचूक मोजा, त्याला नियंत्रित ठेवा, दीर्घायुष्य जगा!’

या वर्षीच्या जागतिक उच्च रक्तदाब दिनाची संकल्पना ही लोकांना नियमित रक्तदाब मोजण्याचे आणि तो नियंत्रणात ठेवण्याचे महत्त्व पटवून देणारी आहे. अचूक मोजमाप, वेळेवर तपासणी आणि आवश्यक ते बदल केल्यास आपण दीर्घायुष्य व निरोगी आरोग्याचा लाभ घेऊ शकतो.

उच्च रक्तदाब एक वाढत्या चिंतेची बाब.

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाबाची समस्या झपाट्याने वाढत आहे. सततचा ताण-तणाव, व्यायामाचा अभाव, फास्ट फूड, धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा आणि झोपेची कमतरता ही यामागची प्रमुख कारणे आहेत. एका अलीकडील अहवालानुसार, भारतातील प्रत्येक तिसरा प्रौढ उच्च रक्तदाबाच्या छायेत आहे, परंतु त्यातील बरेच लोक याची जाणीवही ठेवत नाहीत.

लक्षणे दिसतात उशिरा, पण होतो गंभीर परिणाम.

उच्च रक्तदाबाची स्पष्ट अशी कोणतीही लक्षणे नसतात. मात्र, काही वेळा डोकेदुखी, छातीत दुखणे, थकवा, चक्कर येणे, चेहरा लाल होणे, डोळ्यांत चमक जाणवणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. पण अशा लक्षणांची वाट न पाहता नियमित तपासणी करणे अधिक महत्त्वाचे आहे.

धोके काय आहेत?

उच्च रक्तदाबाचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, किडनी फेल होणे, अंधत्व, ब्रेन हॅमरेजसारख्या गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात. म्हणूनच, हा ‘सायलेंट किलर’ आपल्या नकळत आयुष्य हिरावून घेण्यास सज्ज असतो.

प्रतिबंध आणि उपाय!

उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे आणि तो टाळणे शक्य आहे, जर आपण नियमितपणे खालील गोष्टी आचरल्या:

  • नियमित तपासणी: ३० वर्षांवरील प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा रक्तदाब तपासून घ्यावा.
  • संतुलित आहार: आहारात मीठ व साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवून, भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करावा.
  • व्यायाम: दररोज किमान ३० मिनिटांचा व्यायाम अनिवार्य आहे. चालणे, सायकलिंग, योगा हे उत्तम पर्याय आहेत.
  • तणाव नियंत्रण: ध्यान, योग, सकारात्मक विचारसरणी, आणि छंद यांचा वापर करून तणावावर मात करा.
  • धूम्रपान-मद्यपान टाळा: हे पदार्थ केवळ रक्तदाबच नव्हे तर संपूर्ण आरोग्यास अपायकारक आहेत.
  • वजनावर नियंत्रण: लठ्ठपणामुळे रक्तदाब वाढतो. त्यामुळे निरोगी वजन राखणे आवश्यक.
  • वैद्यकीय सल्ला: रक्तदाब वाढलेला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषधे वेळेवर व नियमित घ्या. स्वतःहून औषध थांबवू नका.

सजग राहा, सुरक्षित राहा!

जागतिक उच्च रक्तदाब दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी हा संकल्प करूया की, आपण आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य जपण्यासाठी नियमित तपासणी करू, योग्य आहार घेऊ, तणावमुक्त राहू आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारू.

आपणच आपला ‘सायलेंट किलर’ ओळखूया… आणि त्याला हरवून आरोग्यपूर्ण, आनंदी आयुष्य जगूया!

संपादक हृषिकेश विश्वनाथ सावंत
9145680102/8855916102
MSc Zoology, M.A. Communication & Journalism, M.A. Political Science.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here