महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी, दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू
रत्नागिरी : दिल्ली येथे २६ जानेवारी रोजी होणाऱ्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात यावर्षी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. कृष्णा साईनाथ मानकापे, मयूर विश्वनाथ घगवे (वाणिज्य शाखा, प्रथम वर्ष) आणि विनय विजय कांबळे (बीबीआय, द्वितीय वर्ष) हे तिघेही कोकणातील प्रसिद्ध कोळी नृत्य सादर करणार आहेत.
अथर्व वेद कला मंच, रत्नागिरी यांच्या सहकार्याने हे विद्यार्थी आपल्या नृत्यकौशल्याने प्रजासत्ताक दिन संचलनात ठसा उमटवणार आहेत. महाराष्ट्राने यावर्षी कोकणातील कोळी नृत्याला प्राधान्य दिले असून राज्यभरातून ६० कलाकारांची निवड करण्यात आली आहे. एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी या निवडीत समाविष्ट झाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दिल्लीतील सराव शिबिरात हे तिघे गेल्या महिन्याभरापासून दिग्गज दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली कोळी नृत्याचा नियमित सराव करत आहेत. या संधीमध्ये अथर्व वेद परंपरा कला मंचचे प्रमुख लक्ष्मण पडवळ, प्रवीण कदम, आणि प्रथमेश कोतवडेकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांनी हा महाविद्यालयासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेच्या संचालिका सीमा हेगशेट्ये, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंदार गीते यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.