रत्नागिरी, प्रतिनिधी | 2 जुलै 2025
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये येत्या 11 जुलैपासून आर्थिक समावेशन योजनांच्या शिबिरांना सुरुवात होणार असून ही शिबिरे 26 सप्टेंबर 2025 पर्यंत चालणार आहेत. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या सूचनेनुसार ही शिबिरे तीन महिन्यांच्या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. शासकीय योजनांचा लाभ जिल्ह्याच्या तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचावा, हा यामागचा प्रमुख हेतू असल्याची माहिती अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे यांनी दिली.
या शिबिरांमध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना यांअंतर्गत नवीन नोंदणी करता येणार आहे. तसेच प्रधानमंत्री जनधन योजनेतर्गत नवीन बँक खाती उघडणे, तसेच आधीपासूनच असलेल्या खात्यांसाठी री-केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. केवायसी प्रक्रिया दर 10 वर्षांनी करावी लागते, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
जुलैमध्ये 11, 18 आणि 25 तारखेला, ऑगस्टमध्ये 1, 8, 22 व 29 तारखेला आणि सप्टेंबरमध्ये 12, 19 व 26 तारखेला ही शिबिरे जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत.
शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळावा, यासाठी नागरिकांनी या शिबिरांमध्ये सहभागी होऊन आपली नोंदणी निश्चित करावी, असं आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे.