लांजा:- बीड जिल्ह्यातील मूळचे असलेले तरुण डॉक्टर शिवराज नवले (BAMS, MS) सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबू, सापुचेतळे (ता. लांजा) येथे कार्यरत आहेत. चिरेखाणीच्या या दुर्गम भागात २४ तास आरोग्यसेवा अत्यावश्यक असताना डॉ. नवले वेळेची तमा न बाळगता सेवा देत आहेत. त्यांच्या आगमनानंतर खाजगी दवाखान्यांतील गर्दी कमी होऊन सरकारी आरोग्य केंद्रात रुग्णांचा ओघ वाढला आहे. पूर्वी सेवेवरून वादग्रस्त ठरलेले हे केंद्र आता डॉ. नवले यांच्या कार्यामुळे विश्वासार्हतेचं प्रतीक बनलं आहे.

दिवसभर OPD फुल असून लहान-मोठ्या शस्त्रक्रिया प्राथमिक आरोग्य केंद्रातच पार पडतात. डॉ. नवले रुग्णांशी प्रेमाने वागतात, समजून सांगतात आणि कुठलेही शुल्क न घेता निःस्वार्थ सेवा देतात. त्यांच्या कार्यामुळे परिसरातील नागरिक समाधानी असून, अशा डॉक्टरांची नियुक्ती म्हणजे लोकांसाठी खरोखरच एक भाग्य ठरत आहे.
ग्रामीण भागातील आरोग्यसेवा ही अनेकदा सुविधा, मनुष्यबळ व संसाधनांच्या अभावामुळे दुर्लक्षित राहते. अशा वेळी डॉक्टर शिवराज नवले यांसारखे सेवाभावी व कर्तव्यनिष्ठ डॉक्टर हे गावासाठी आशेचा किरण ठरतात. प्राथमिक पातळीवर दर्जेदार उपचार, वेळेवर निदान आणि रुग्णांशी स्नेहपूर्ण वागणूक देणे ही त्यांच्या सेवेची वैशिष्ट्ये आहेत. समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यास त्यांच्या कार्याचा मोठा वाटा आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबू येथे कर्मचारी अपुरे असतानाही डॉ. नवले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेवा सुरळीत व दर्जेदार सुरू आहे. सीमित मनुष्यबळ असूनही नियोजनबद्ध पद्धतीने रुग्णसेवा केली जात असल्यामुळे लोकांमध्ये समाधान आणि विश्वास निर्माण झाला आहे.