रत्नागिरी:- दादर, मुंबई: नवनिर्वाचित आमदार माननीय श्री. किरण (भैय्या) सामंत यांना महाराष्ट्र प्रगतिशील विकास संस्था (एमपीव्हीएस) तर्फे अभिनंदन करण्यात आले. काल, ५ जानेवारी २०२५ रोजी सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट हॉल, दादर येथे आयोजित विजयी आभार-सत्कार सोहळ्यात मुंबईतील एमपीव्हीएस पदाधिकाऱ्यांनी श्री. सामंत यांची भेट घेतली.
तालुका आरोग्य व्यवस्थेसाठी विशेष निवेदन
या कार्यक्रमात संस्थेने लांजा-राजापूर परिसरातील ग्रामीण आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी निवेदन सादर केले. सध्या नूतनीकरणाधीन लांजा ग्रामीण रुग्णालयाला “उपजिल्हा रुग्णालय” दर्जा देण्याची मागणीही करण्यात आली. यासोबतच, ढासळलेल्या तालुका आरोग्य व्यवस्थेच्या सुधारण्यासाठी सर्वंकष उपाययोजना राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
एमपीव्हीएसची सामाजिक बांधिलकी
एमपीव्हीएस संस्था मागील आठ वर्षांपासून तालुका स्तरावर आरोग्य, शिक्षण, रोजगार, आणि पर्यटन क्षेत्रांत विविध उपक्रम व शिबिरे राबवत आहे. ग्रामीण रुग्णालयीन सेवा सुधारण्यासाठी संस्थेने सातत्याने प्रयत्न केले आहेत. संस्थेचे मुख्यसचिव अजय मांडवकर यांनी आपल्या भाषणात ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमातील मान्यवर उपस्थिती
सत्कार सोहळ्यात एमपीव्हीएसचे मुख्यसचिव अजय मांडवकर, माजी अध्यक्ष व सल्लागार विजय भगते, हिशोब तपासणीस राजेश राघव, सभासद कल्याणी, फंड प्रमुख संदीप म्हादये, माजी हिशोब तपासणीस सचिन गोठणकर, पश्चिम रेल्वे विभाग प्रमुख विलास जोगळे, संकेत ठीक, राजन सुर्वे, चंद्रकांत गितये आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेची पुढील दिशा
एमपीव्हीएसने ग्रामीण आरोग्य, शिक्षण व रोजगारासाठी कार्य सुरूच ठेवण्याचे ठरवले असून, तालुका स्तरावर शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सतत पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.