रत्नागिरी: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आरोग्य सेवा दिवसेंदिवस महागड्या होत असल्याने सर्वसामान्य रुग्णांना उपचार परवडत नाहीत. अनेकजण आपल्या आरोग्य समस्या दुर्लक्षित ठेवतात. या पार्श्वभूमीवर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय, झडपोली (ता. विक्रमगड, जि. पालघर) यांच्या सहकार्यातून कोळंबे (ता. जि. रत्नागिरी) येथे मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराची सुरुवात सकाळी १० वाजता दीप प्रज्वलन व महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कोळंबे गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
शिबिरात मोफत तपासणी व उपचार
या शिबिरात नेत्र तपासणी, रक्तदाब, शुगर तपासणी, मोफत औषध वाटप, तसेच मोतीबिंदू, मुतखडा, हर्निया, अपेंडिक्स, हायड्रोसिल यांसारख्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. एकूण १५२ रुग्णांची नोंदणी झाली, त्यापैकी २३ रुग्णांना मोतीबिंदू निदान झाले, तर ८७ जणांना मोफत चष्मे देण्यात आले. गरजू रुग्णांना संस्थेच्या हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच इ.सी.जी. तपासणीही करण्यात आली.
विशेष तज्ज्ञ डॉक्टरांचे योगदान
या शिबिरात मुंबई-ठाणे येथील तज्ज्ञ डॉक्टर व नर्सिंग स्टाफने उत्कृष्ट सेवा प्रदान केली.
सामाजिक बांधिलकी जोपासणारे मान्यवरांचे सहकार्य
शिबिरात जिल्हाध्यक्ष अॅड. महेंद्र मांडवकर यांनी जिजाऊ संस्थेच्या कार्याची माहिती उपस्थित नागरिकांना दिली. कार्यक्रमासाठी कोळंबे गावचे सरपंच प्रशांत उर्फ अण्णा पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमात मान्यवरांचा सहभाग
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मातोश्री पतसंस्थेचे सचिव संजय साळवी, लोकराज्य ग्राम समिती अध्यक्ष रवींद्र मांडवकर, माजी उपसरपंच हेमंत पवार, सामाजिक कार्यकर्ते विश्वास दामले, सुशील कुमार पारकर, अजित हातिसकर, सचिन भातडे, मंदार मांडवकर, सुरज गावडे, दिवाकर पाटील, अमेय वैद्य, सुशील राहटे, राजन भातडे, सुमित जोशी, विनोद आग्रे, प्रल्हाद गोरीवले, सुनील गावडे, प्रमोद बने, रुपेश ठीक, विजय कानसरे, प्रमोद नागवेकर, विकास लाखण, माजी सरपंच सौ. प्रीती गावडे, सुकेश शिवलकर आणि इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे ऑप्टोमेट्रीक तज्ज्ञ किशोर सूर्यवंशी सर उपस्थित होते, तसेच लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे विशेष सहकार्य लाभले.
विशेष उपस्थिती आणि सूत्रसंचालन
अॅड. महेंद्र मांडवकर यांचे शालेय मित्र रुपेश ठीक, नागेश साळवी, श्रीकांत पवार, तसेच ठाणे येथून प्रियांका चाळके यांनीही उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉ. सदानंद आंग्रे यांनी आपल्या अमोघ वाणीतून केले.
समाजासाठी आरोग्यदायी पाऊल
या शिबिरामुळे कोळंबे गावातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय यांचे सामाजिक बांधिलकीचे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.