दशावतार प्रशिक्षण कार्यक्रमाला अध्यात्मिक आणि व्यवस्थापन कौशल्याची जोड!

0
13

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी यांच्या बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स अभ्यासक्रमाच्या सहकार्याने दशावतार विद्यार्थ्यांसाठी रंगभूषा, वेशभूषा आणि कला सादरीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सिद्धेश कलिंगण प्रस्तुत कल्लेश्वर दशावतार नाट्य मंडळ यांचा विशेष कार्यक्रम यानिमित्ताने पार पडला.

दशावतार – कला, श्रद्धा आणि व्यवस्थापन कौशल्याचा मिलाफ

सिंधुदुर्ग आणि गोवा परिसरात दशावतार नाट्य कला अत्यंत श्रद्धेने तसेच व्यावसायिक पद्धतीने सादर केली जाते. ही लोककला केवळ एक परंपरा नसून रोजगार निर्मितीचे मोठे साधन बनली आहे. विशेष म्हणजे, दशावतार नाट्य मंडळांमध्ये कलाकार स्वतःच वेशभूषा, रंगभूषा आणि इतर व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतात. स्त्री पात्र विरहित दशावतार सादरीकरणातही नियोजनबद्ध पद्धतीने सर्व भूमिका साकारल्या जातात. यामध्ये कला आणि व्यवस्थापनाला अध्यात्मिक आधार असल्याने दशावतार हा कलेचा प्रकार सातत्याने श्रद्धा आणि निष्ठेने जिवंत आहे.

बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स – लोककलेला नवे व्यासपीठ

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या स्वायत्ततेनंतर मुंबई विद्यापीठाच्या बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स (BPA) अभ्यासक्रमात नाट्य, नृत्य, संगीत तसेच सांस्कृतिक वारसा (Cultural Heritage) या विषयांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. पहिल्याच वर्षी ४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, त्यांना दर्जेदार लोककलेची ओळख व सादरीकरणाचे प्रशिक्षण देणे हा अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

दशावतार प्रशिक्षण शिबिर १७ ते २५ मार्च २०२५

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, श्री. नंदकिशोर जुवेकर व डॉ. आनंद आंबेकर (BPA विभागप्रमुख) यांच्या समन्वयाने, तसेच पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या प्रयत्नांमुळे १७ ते २५ मार्च २०२५ या कालावधीत दशावतार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना दशावतारातील वेशभूषा, रंगभूषा आणि सादरीकरणाच्या विविध तंत्रांची माहिती व प्रात्यक्षिके दिली जात आहेत.

विशेष सहकार्य व मान्यवर उपस्थिती

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखरकर, उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, समन्वयक डॉ. मीनल खांडके, विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर, प्रा. वेदांग सौंदलगेकर, प्रा. हरेश केळकर, प्रा. कश्मिरा सावंत तसेच बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here