रत्नागिरी, प्रतिनिधी: शिवसेना (उद्धव ठाकरे गट) रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी मंगळवारी आपल्या तालुकाप्रमुख पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्या राजीनाम्यामुळे उद्धव ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे.
राजीनाम्याचे कारण वैयक्तिक असल्याचा दावा
बंड्या साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधताना, “माझ्या वैयक्तिक कारणांमुळे मी राजीनामा दिला आहे,” असे स्पष्ट केले. त्यांनी आपल्या राजीनाम्यात नमूद केले आहे की, २००७ पासून त्यांनी प्रामाणिकपणे संघटनेची सेवा केली आहे, परंतु वैयक्तिक कारणामुळे आता पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहेत.
शिंदे गटात प्रवेशाची शक्यता
साळवी लवकरच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. या संभाव्य घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा इशारा
राजकीय भूकंप घडवणार असल्याचा दावा करणाऱ्या सामंत यांच्या वक्तव्यानंतर साळवींच्या राजीनाम्याने पडसाद उमटले आहेत. आता पुढचा क्रम कोणाचा याची उत्सुकता राजकीय क्षेत्रात वाढली आहे.
उद्धव ठाकरे सेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग?
या राजीनाम्यानंतर उद्धव सेनेचा कोकणातील बालेकिल्ला हादरल्याचे जाणवत आहे. साळवींच्या या निर्णयामुळे कोकणातील शिवसेना गटांतर्गत संघर्ष उघड झाला आहे.
संपादक: हृषिकेश विश्वनाथ सावंत
तारीख: २१ जानेवारी २०२५