रत्नागिरी:- कोरोनाच्या काळात शिरगाव ग्रामपंचायतीकडून एका बांगलादेशी व्यक्तीला दाखला देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, जिल्हा परिषदेच्या चौकशीनंतर तत्कालीन ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिली.
चौकशीमध्ये दाखला कोणत्या आधारावर देण्यात आला, याचा तपास सुरू असून, संबंधित व्यक्तीने भारतीय नागरिकत्वाशी संबंधित अन्य कागदपत्रे तयार केली आहेत का याचीही तपासणी केली जात आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या हस्तक्षेपानंतर ग्रामसेवकाने चुकून झाल्याचे सांगितल्याचे समजते.
तपासादरम्यान, कोरोना काळात अन्य कोणी बांगलादेशी नागरिकांना दाखले दिले आहेत का, याचीही चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण तपास पूर्ण होईपर्यंत ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आले आहे.