मुंबई:- आज मुंबईत महाराष्ट्र सागरी मंडळ (मेरिटाइम बोर्ड) च्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मालवणच्या पर्यटन विकासासाठी क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले. या बैठकीत देवबाग-संगम येथे अत्याधुनिक ‘ग्रोयसं’ बंधाऱ्याची उभारणी करण्यास मंजुरी देण्यात आली.
तसेच, पर्यटकांच्या वाढत्या संख्येला लक्षात घेऊन मालवण जेट्टी ते दांडी या भागात मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर प्रॉमिनाड्स तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सुविधेमुळे स्थानिक पर्यटनाला नवी चालना मिळेल, तसेच पर्यटकांचा अनुभव अधिक सुखकर होईल.
भविष्यातील गरजा लक्षात घेऊन, फक्त बंधाऱ्यांची उभारणी न करता रस्ता-कम-बंधारा स्वरूपाचे प्रकल्प हाती घेणे आवश्यक असल्याचे ठरवण्यात आले. या महत्त्वपूर्ण निर्णयांसह इतर अनेक प्रलंबित आणि प्रस्तावित विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली.
ही बैठक मालवणच्या विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलण्यासाठी ऐतिहासिक ठरली असून, स्थानिक आणि पर्यटकांसाठी नव्या संधींचे दार उघडणारी ठरेल.