रत्नागिरी – केरळहून मासेमारीसाठी आलेल्या एका बोटीचे इंजिन नादुरुस्त झाल्याने ती बोट दुरुस्तीसाठी मिरकरवाडा बंदरात आणली जात होती. यादरम्यान, बोटीवरील खलाश्याला अचानक चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला. तातडीने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
मृत खलाश्याचे नाव सबस्टेन एस (वय ४६, रा. तिरुअनंतपुरम्, केरळ) असे आहे. ही घटना रविवारी (२ फेब्रुवारी) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, केरळहून आलेल्या या मासेमारी बोटीचे इंजिन बंद पडले होते. कस्टम अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ती बोट मिरकरवाडा बंदरात आणली जात असताना सबस्टेन एस याला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि तो बेशुद्ध पडला. तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.