पुणे:- भोर, राजगड, आणि मुळशी विभागातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी आणि पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सादर करण्यात आला.
आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यासोबत लवकरच संवर्धन कार्य सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांनी गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा सुरक्षित ठेवण्यासाठी व्यापक लोकसहभाग मिळवण्याचे आवाहन केले.
या बैठकीला गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या पुणे जिल्हाध्यक्ष आशिष भोसले, संपर्कप्रमुख अनिकेत मेने, प्रमोद रेणुसे, प्रवीण ढेबे यांच्यासह अनेक मावळे उपस्थित होते.
संवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून गडकिल्ल्यांचे रक्षण, जतन, आणि पर्यटनवाढ हे मुख्य उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे.