एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
रत्नागिरी:- सावित्रीबाई फुले यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यातला छोटासा विचार घेऊन आपण पुढे गेलो, तो अंमलात आणला तरी आजच्या पिढीकडून त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांनी केले.
नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय आणि एस. पी. हेगशेट्ये वरिष्ठ महाविद्यालयातील महिला विकास कक्ष आणि सामाजिक शास्त्र विभाग यांच्या वतीने आज (३ जानेवारी) सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे उपस्थित होते.
चेअरमन श्री. हेगशेट्ये म्हणाले, सावित्रीबाई यांच्या आठवणी चिरंतन आहेत. त्यांच्यामुळेच आजची स्त्री उंबरठ्याच्या बाहेर आली. समाजाच्या विरोधाला झुकारून जेव्हा त्या शिक्षण देण्यासाठी बाहेर पडल्या त्यावेळी त्यांना त्रासाला सामोरे जावे लागले; मात्र त्यांनी त्यावर मात केली. महिला- पुरुष हा भेदभाव न करता शिक्षण प्रत्येकाचा हक्क असल्याचे ज्ञान त्यांनी त्या काळात दिले. आज स्त्रियांना कोणत्याही क्षेत्रात जाण्यासाठी बंधन नाही.
केवळ साक्षरतेच्या कामावरच न थांबता त्यांनी परीतक्त्या स्त्रियांसाठीही कार्य केले. स्त्रियांना समाजात मान सन्मान मिळाला पाहिजे हाच त्यामागचा उद्देश होता. ज्योतिबा फुलेंनी उभारलेली शिक्षणाची चळवळ सावित्रीबाईंनी मोठी केली. जागतिक शांतता नोबेल प्राप्त मलाला युसुफझाई ही सावित्रीबाईंचा वारसा असल्याचे सांगून मलाला युसुफझाईची माहिती कथन केली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी सावित्रीबाई यांच्या काळातील सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेतला. तत्पूर्वी पल्लवी फोंडे, फिजा पटेल (दोघीही कला शाखा तृतीय वर्ष), तन्झिला कोतवडेकर (बीएमएस, प्रथम वर्ष), सानिया खतीब, बुश्रा खान (दोघीही वाणिज्य शखा, तृतीय वर्ष), जोया होडेकर, सानिया लांब आणि झैनब दळवी (११ वी, विज्ञान शाखा) या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करून सावित्री बाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला.
प्रारंभी सावित्रीबाई फुले आणि सह शिक्षिका फातिमा शेख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अन्विता देवळेकर यांनी केले. महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. निकिता नलावडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सामाजिक शास्त्र विभागाच्या प्रा. पूर्णिमा सरदेसाई, प्रा. वर्षा कुबल, प्रा. निकिता पिलणकर यांच्यासह विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.