रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदाचा पदभार शैलेश बापट यांनी स्वीकारला आहे. या पदावर यापूर्वी कार्यरत असलेले रवींद्र कांबळे यांची मडगाव येथे प्रशासकीय बदली झाली आहे. कोकण रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक (Konkan Railway Regional Manager) पदी नव्याने रुजू झालेले शैलेश बापट रत्नागिरी (Ratnagiri Maharashtra) चे सुपुत्र असल्याने त्यांचे विशेष स्वागत होत आहे.
शैलेश बापट कोकण रेल्वेच्या (Shailesh Bapat Kokan Railway) अगदी उभारणीच्या कामापासून कोकण रेल्वेशी जोडलेले आहे. बांधकाम अभियंता म्हणून ते कोकण रेल्वेच्या सेवेत रुजू झाले होते. १९९७ पर्यंत ते संगमेश्वर विभागात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत होते. या काळात त्यांनी संगमेश्वर स्टेशन उभारणी, गोळवली आणि शास्त्री नदीवरील पुलांच्या उभारणीच्या कामात त्यांनी मोठे योगदान दिले. कोकण रेल्वेच्या बांधकामाचा टप्पा पूर्ण केल्यानंतर त्यांना मानव संसाधन विभागात कार्मिक निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली. कोकण रेल्वे साठी अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या जम्मू काश्मिर मधील प्रकल्पावर ही शैलेश बापट यांनी काम केले आहे.
कार्यकारी संवर्गातून त्यांची पदोन्नती होऊन त्यांना जम्मू काश्मीर प्रकल्पातील जवाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. यानंतर बेलापूर कॉर्पोरेट ऑफिस येथे कार्मिक विभागात कार्यरत असताना मानव संसाधन विभागाशी संबंधित सॉफ्टवेअर अद्यावत करण्यात त्यांनी विशेष पुढाकार घेतला होता. या कामाबरोबरच त्यांच्या इतरही उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना कोकण रेल्वे कडून तीन वेळा चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
कोकण रेल्वेच्या उभारणी पासून रेल्वेशी जोडलेल्या शैलेश बापट यांनी आता कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. मूळ रत्नागिरीचे असलेल्या शैलेश बापट यांचे शालेय शिक्षण रत्नागिरीतील फाटक हायस्कूल आणि रा. भा. शिर्के प्रशालेत झाले. तसेच शासकीय तंत्रनिकेतनमधून त्यांनी स्थापत्य विषयातील पदविका प्राप्त केली आहे. त्यांचे वडील दामोदर बापट आणि आई रेखा बापट दोघेही शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत.शैलेश बापट यांची रत्नागिरीत नियुक्ती झाल्याचे कळताच शासकीय तंत्रनिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.