दापोली:- शहरातील दापोली शिक्षण संस्था संचलित ए.जी. हायस्कूलच्या अकरावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी जयंती (Mahatma Gandhi Jayanti) निमित्त शालेय परिसराची स्वच्छता केली. यावेळी विद्यालयामध्ये महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती (Lal Bahadur Shastri Jayanti) मुख्याध्यापक एस.एम.कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी विद्यालयातील शिक्षक ओजस तेरेदेसाई यांनी लालबहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी यांच्या कार्याविषयी मोजक्या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. तसेच त्यांनी यावेळी महात्मा गांधी व शास्त्री यांची साधी राहणी यांच्यासह अनेक विविध गोष्टी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितल्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मुख्याध्यापक एस.एम. कांबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील काही पैलू विद्यार्थ्यांसमोर उलगडले. या कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्याध्यापक डी.एम. खटावकर, पर्यवेक्षक मोहिनी खटावकर, जेष्ठ शिक्षक नितीन मुंडेकर, श्री. राजेंद्र हांडे तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संध्या सकपाळ यांनी केले. सूत्रसंचालन जीवन कदम तर आभार स्नेहल डोंगरे यांनी मानले.