समाज आणि राष्ट्र उभारणीसाठी वाचनवृद्धीची आवश्यकता : डॉ. आशा जगदाळे.

0
12

महापरिनिर्वाण दिनानिमित्त “नवनिर्माण” मध्ये महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.

रत्नागिरी:- समाज आणि राष्ट्र उभारणीसाठी ग्रंथवाचन, ग्रंथसंग्रह, ग्रंथभेट, वाचनवृद्धी यांची आवश्यकता आहे. ग्रंथासारखा जगात दुसरा मित्र नाही. डॉ. आंबेडकर वाचनामध्ये एवढे मग्न होत, की त्यांना किती वाजलेत याचे भान राहन नसे. आपल्या महाविद्यालयातील वाचनालयात वाचनालयातही १६ हजार पुस्तकांची संपदा आहे. विद्यार्थ्यांनी वाचनालयाला भेट देऊन जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन करावे, असे आवाहन एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी केले.

नवनिर्माण शिक्षण संस्था संचालित नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय आणि एस. पी. हेगशेट्ये वरिष्ठ महाविद्यालय यांच्या विद्यमाने आज (६ डिसेंबर) महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कला विभाग प्रमुख डॉ. पूजा मोहिते, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. सुशील साळवी, नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे उपस्थित होते.



प्राचार्या डॉ. जगदाळे पुढे म्हणाल्या, शिक्षणाचे महत्त्व बाबासाहेबांच्या वडिलांना, रामनीबाबांना समजले होते म्हणून रामजीबाबांनी जाणीवपूर्वक बाबासाहेबांची जडणघडण केली. रामजीबाबा स्वत: शिक्षक होते. बाबासाहेबांना पहाटे उठवून ते त्यांचा अभ्यास घेत, त्यांच्याकडून पाठांतर करवून घेत. त्यांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी रामजीबाबांनी प्रचंड कष्ट घेतले. त्यातूनच डॉ. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व आकाराला आले. डॉ. बाबासाहेबांनी प्रचंड ग्रंथसंग्रह केला. ज्ञान मिळवले. परंतु हे ज्ञान केवळ स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी न वापरता भापल्या समाजासाठी वापरले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पासष्ट वर्षाच्या आयुष्यात अनेक भूमिका समर्थपणे पार पाडल्या. अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ञ, कायदेपंडित, पत्रकार, संसदपटू, समाजसुधारक, राजकीय मुत्स‌द्दी, बद्ध धर्माचे प्रवर्तक अशा अनेक भूमिका त्यांनी निभावल्या. भारताच्या राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक, शैक्षणिक जीवनात परिवर्तन घडवून आणले. भारताच्या राज्यघटनेचे ते शिल्पकार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून हे जाणवते की अभ्यासाने माणूस मोठा होतो. खरे म्हणजे सततचा अभ्यास ही एका प्रकारची तपश्चर्या असते. आजच्या विद्यार्थ्यांनी आंबेडकरांच्या जीवनापासून बोध घेतला पाहिजे.

यावेळी स्वराणी सावंत, प्रथमा थापा, मुजहिरा इफ्जी, मेहक खान, सानिया खतीब, बुशरा खान या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पौर्णिमा सरदेसाई यांनी केले. सूत्रसंचालन द्वितीय वर्ष कला शाखेचा विद्यार्थी अद्वैत शेट्ये याने केले. प्रा. सुशील साळवी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here