देवरूख:- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या इंग्लिश विभागाच्या ‘ॲस्पीरंट्स’ या अंकाचा प्रकाशन सोहळा प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांना पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीया कांबळे व मिताली कांबळे या द्वितीय वर्ष, कला वर्गातील विद्यार्थीनींनी खुमासदार पद्धतीने केले.
प्रास्ताविकात प्रा. स्वप्ना पुरोहित यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाबरोबर इंग्लिश भाषेच्या प्रात्यक्षिक अनुभवाद्वारे इंग्लिश भाषेवर प्रभुत्व अवगत करता येण्यासाठी, तसेच इंग्लिश भाषा कार्यात्मक पद्धतीने समजून व त्यातून प्रात्यक्षिक अनुभव मिळणार असल्याचे स्पष्ट केले. आधुनिक प्रसार माध्यमांसाठी आवश्यक असणारी विविध कला व कौशल्यांची ओळख या उपक्रमातून होणार असल्याची माहिती प्रा. पुरोहित यांनी दिली.
नवीन शैक्षणिक धोरणांनुसार हा उपक्रम राबवला गेला असून प्रथम व द्वितीय वर्ष, कला वर्गातील विद्यार्थ्यांनी कॉलेजमधील घडामोडींसह देवरुख शहराच्या सभोवतालच्या महत्वाच्या घटना, कथा, लेख आणि बातम्यांचा अंकात समावेश आहे. या अंकासाठी आवश्यक माहिती गोळा करताना आलेले अनुभव श्वेता वणकुंद्रे, जीनत जेठी आणि राखी वैद्य या प्रथम वर्ष, कला वर्गातील विद्यार्थिनींनी उपस्थितांसमोर कथन केले. या अंकासाठी मेहनत घेणाऱ्या प्रथम वर्ष, कला वर्गातील विद्यार्थ्यांना प्राचार्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी जीवनातील सहकार्य, संज्ञापन(संवाद) आणि समन्वय यांचे महत्त्व आणि उपयुक्तता याबाबत सविस्तर विवेचन केले. समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. विकास शृंगारे यांनी प्रदर्शित अंक व विद्यार्थ्यांच्या साहित्यविषयीचा आढावा घेतला. प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना, विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाला कौतुकाची थाप दिली. वैविध्यपूर्ण इंग्रजी साहित्याचे वाचन, मनन व चिंतनाचे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात व अभ्यासात असणारे महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन केले. इंग्रजी भाषा व साहित्य यामध्ये विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या करिअरच्या विविध संधी याप्रसंगी विशद केल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. स्वप्ना पुरोहित यांनी केले. या सोहळ्याला इंग्रजी विभागातील ४० विद्यार्थ्यांसह बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते.