देवरुख:- देवरूखच्या श्री गणेश वेदपाठशाळेच्या २७व्या वर्धापन दिन समारोहाचे आयोजन बुधवार दि.१८ डिसेंबर ते शुक्रवार दि. २०डिसेंबर,२०२४ या कालावधीमध्ये करण्यात आले आहे. संपूर्ण संगमेश्वर तालुक्यासाठी भूषणावह असणाऱ्या श्री गणेश वेदपाठशाळेचा वर्धापनदिन समारोह हा रसिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. भारतीय वेदिक शिक्षण, अध्यात्म, संस्कृती, संस्कार आणि परंपरेचे जतन करणारी ही रत्नागिरी जिल्ह्यातील एक नावाजलेली संस्था आहे.
समारोहाचा प्रारंभ दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी ८:०० ते १२:३० या वेळेत ‘नवग्रह यागा’ने होणार असून, दि.१९ आणि दि.२० रोजी सकाळी ८:०० ते १२:३० या वेळेत ‘नवग्रह याग’ संपन्न होणार आहे. समारोहाच्या पहिल्या दिवशी निजसुरे वेदशाळा अंजर्ले स्मृती व्याख्यानमाला निधी अंतर्गत सायंकाळी सुप्रसिद्ध वैद्य श्री. सुविनय दामले, कुडाळ यांचे सायं.६:०० ते ८:०० वेळात “आयुर्वेद आणि दिनचर्या” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. दि.१९ रोजी सायं.६:०० ते ८:०० यावेळेत प्रा मुग्धा गरसोळे- कुलकर्णी, पुणे यांचे “अथर्वशीर्ष- तत्त्व महत्त्व” या विषयाचे आयोजन करण्यात आले आहे.
समारोहाचे समापन दि. २० रोजी सायं. ६:०० ते ८:०० या वेळेत ह. भ. प. डॉ. सौ. अवंतिका टोळे, पुणे यांच्या सुश्राव्य कीर्तनाने होणार आहे. रोज रात्री ८:०० ते ९:०० या वेळेत उपस्थित सर्वांसाठी भोजनप्रसाद आणि त्यानंतर ९:०० ते १०:०० आरती होणार आहे. तरी कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गणेश वेदपाठशाळेचे अध्यक्ष श्री. संजय भागवत यांनी केले आहे.