Chiplun: चिपळूणचे डॉ. तेजानंद गणपत्ये दुसऱ्यांदा आयर्नमॅन.

0
13

चिपळूण:- ऑस्ट्रेलियामधील बसलटन या ठिकाणी पार पडलेल्या जागतिक आयर्नमॅन (Iron Man) स्पर्धेमध्ये चिपळूणच्या डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी सुयश मिळवले. ३.८ किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी धावणे हे तिन्ही क्रीडा प्रकार सलगपणे करणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. या स्पर्धेसाठी १७ तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. या वेळेमध्ये सर्व नियमांच्या अधीन राहून हे अंतर पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना आयर्नमॅन हा किताब मेडल तसेच फिनिशर टी-शर्ट देऊन गौरवण्यात आले.

या स्पर्धेमध्ये हिंदी महासागरामधील जिओग्रफी बे हा समुद्राचा भाग निवडण्यात आला होता. स्पर्धेदरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उंच लाटा उठत होत्या. त्यांचे आव्हान पेलत डॉ. गणपत्ये यांनी हे अंतर १ तास ४३ मिनिटांमध्ये पूर्ण केले. सायकलिंगचा रस्ता निसर्गरम्य अशा समुद्रकिनाऱ्यावरून तसेच दाट जंगलातून आणि शेतामधून जाणार होता. सायकलिंग दरम्यान काही वेळ पाऊस पडल्यामुळे समोरून येणाऱ्या गार बोचऱ्या वाऱ्यांचा त्यांना सामना करावा लागला. हे अंतर त्यांनी ६ तास ४५ मिनिटांमध्ये कापले.

त्यानंतर सर्वात अवघड अशा ४२ किलोमीटर धावणे या प्रकारामध्ये थंड हवामान आणि शेजारील समुद्राची गाज अशा आल्हाददायक वातावरणामध्ये हे अंतर डॉ. गणपत्ये यांनी ५ तासात पार केले. मागील वर्षी कझाकिस्तान येथे झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेमध्ये नोंदवलेल्या वेळेपेक्षा १ तास २५ मिनिटे कमी वेळ नोंदवत डॉ. गणपत्ये यांनी एकूण १३ तास ५२ मिनिटांमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली. हया यशाचे श्रेय त्यांनी आपले कुटुंबीय तसेच कोच पंकज रावळू व आशिष रावळू यांना दिले. या स्पर्धेमध्ये एकूण १३५२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ११११ स्पर्धकांनी स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. भारतामधून सहभागी झालेल्या ३८ स्पर्धकांपैकी २९ स्पर्धक यशस्वी ठरले. सलग दुसऱ्या वर्षी फुल आयर्नमॅन हा किताब मिळवणाऱ्या डॉ. गणपत्ये यांचे चिपळूणमध्ये जोरदार स्वागत झाले. या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.

यासंदर्भात डॉ. तेजानंद गणपत्ये म्हणाले की, मागील वर्षी कझाकस्तानमध्ये आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केली होती. अनेक जण मला विचारतात की एवढा त्रास घेऊन पुन्हा दुसऱ्या ठिकाणी कशासाठी? माझे उत्तर असते फिटनेस ही एक लाइफस्टाइल आहे. आपल्याला निरंतर प्रॅक्टिस मध्ये राहायचे असेल तर समोर काहीतरी गोल असणे आवश्यक आहे. नाहीतर एक प्रकारची मरगळ येते आणि आपण तेवढ्या सातत्याने वर्कआउट करत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हे चॅलेंज स्वीकारून स्वतःला सिद्ध करण्याचे मी ठरवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here