
देवरुख:- माध्यमिक विद्यामंदिर अँड ज्युनियर कॉलेज, नाणीज यांच्या भाषा विषय समितीमार्फत आयोजित जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेत देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु.सई सुंदर नर (१२ वी वाणिज्य) हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. कु. सईने ऐतिहासिक महाराणी ताराबाई यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व सअभिनय सादर करून परीक्षकांची व उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या प्रथम क्रमांकाच्या यशस्वी कामगिरीसाठी रुपये १,०००/- रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
कनिष्ठ महाविद्यालयातून कु. सुकन्या शंकर बागवे(११वी वाणिज्य) हिने अहिराणी भाषेतील ‘मी मुख्यमंत्री बोलते’ या विषयावर अभिनय सादर करून उपस्थितांची शाबासकी मिळवली. प्रथम क्रमांक प्राप्त सई नर हिला दिग्दर्शक व अभिनेते प्रभाकर डाऊल, रोमा बोरुकर आणि प्रा. सीमा शेट्ये यांचे मार्गदर्शन लाभले, तर सुकन्या बागवे हिला प्रा. संदीप मुळ्ये आणि प्रा.स्वप्नाली झेपले यांनी मार्गदर्शन केले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सई आणि सुकन्या यांना त्यानी मिळवलेल्या यशासाठी सन्मानित केले. यावेळी प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे कौतुक करून त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संदीप मुळ्ये, प्रा. सुनील वैद्य, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. संचिता चाळके, प्रा. सीमा शेट्ये आणि प्रा धनंजय दळवी उपस्थित होते.