रत्नागिरी जिजाऊच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा.
रत्नागिरी:- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र – विभाग रत्नागिरी संचलित खंडाळा ता. रत्नागिरी येथील जिजाऊ मोफत स्पर्धा परीक्षा केंद्राचा विद्यार्थी कु. आंनद रविकांत शिकरे याची भारतीय नौदलात (Indian Navy) मध्ये सेलर या पदावर अंतिम निवड झाली आहे. गुणवत्ता यादीत येत त्याने या उत्कृष्ट यशाला गवसणी घातली आहे. आनंद शिकरे हा लांजा तालुक्यातील अंजणारी या लहान अशा गावातील आणि शेतकरी कुटुंबातील मुलगा पण त्याची जिद्द आणि योग्य वेळी मिळालेले जिजाऊच्या मैदानी आणि लेखी परीक्षांसाठी तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन याचा त्याला लाभ झाला.

त्याच्या या यशातून लांजा तालुक्यातून व अंजणारी परिसरातील युवक व युवती प्रेरणा घेतील व जिजाऊ संस्था मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र लांजा, रत्नागिरी, सापुचेतळे आणि खंडाळा या केंद्राचा लाभ घेतील असा आशावाद जिजाऊ संस्थेची सचिव श्री. केदार चव्हाण, जिल्हा अध्यक्ष श्री. प्रथमेश गावणकर व जिजाऊचे कायदेशीर सल्लागार श्री महेंद्र मांडवकर यांनी व्यक्त केला. जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. निलेश सांबरे (Nilesh Sambre) यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी विभागातील जिजाऊ संस्था सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत आहे. जिजाऊ संस्थेच्या या सामाजिक कार्याबद्दल जिजाऊ संस्था व पदाधिकाऱ्यांचे समाजातील सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.