रत्नागिरी:- कुवारबाव येथील कमलबाई विसपुते इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मिस्त्री हायस्कूलच्या इब्राहिम सिद्दिकीने तर दिव्यांग गटात मुनिबा बारगीरने प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच प्रयोगशाळा सहाय्यक व परिचय या विभागामध्ये प्रशालेतील प्रयोगशाळा सहाय्यक इम्तियाज काजी यांनी लॅब इन हॅन्ड प्रकल्प सादर करून तृतीय क्रमांक मिळवला.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कुवारबाव येथील कमलबाई विसपुते इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकतेच झाले. यामध्ये प्राथमिक गटात मिस्त्री हायस्कूलमधील सहावीत शिकणाऱ्या इब्राहिम सिद्दिकीने शेतकऱ्यांसाठी बहुउपयोगी यंत्र प्रतिकृती सादर केली होती. त्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर प्राथमिकच्या दिव्यांग गटामध्ये आठवीतील मुनिबा बारगीरने सेव्ह एनर्जी सेव्ह इलेक्ट्रिसिटी प्रतिकृती सादर केला होता. या विद्यार्थ्यांना विज्ञानशिक्षक इम्तियाज सिद्दिकी यांचे मार्गदर्शन लाभले. माध्यमिक गटामध्ये विद्यार्थी प्रतिकृती विभागात नववीमधील आवेस वस्ता, प्रश्नमंजुषा या विभागात नववीमधील जुनेद मुजावर व उमर हिप्परगी यांनी सहभाग नोंदवून प्रशालेचे प्रतिनिधित्व केले. या विद्यार्थ्यांना हुजेफा मुकादम आणि इकबाल मुजावर यांचे मार्गदर्शन लाभले.
प्राथमिक गटात शैक्षणिक साहित्य या विभागात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे शैक्षणिक साहित्य झीनत वाडकर यांनी सादर केले. माध्यमिक गटात शैक्षणिक साहित्य या विभागात गुड कंडक्टर, बॅड कंडक्टर हे शैक्षणिक साहित्य मिरकर यांनी सादर केले. मुख्याध्यापक जुबेर गडकरी, संस्थेचे अध्यक्ष अब्दुल हमीद मिस्त्री, सचिव तनवीर मिस्त्री, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निसार लाला, खजिनदार जाहीर मिस्त्री, सहसचिव शकील मजगांवकर, संचालक रफिक मुकादम, साबीर मजगांवकर व पर्यवेक्षक मुश्ताक आगा यांनी अभिनंदन केले.