सहकार नगर येथील प्रभाग क्रमांक ५ व ६ ला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपरिषद पाण्याच्या टाकीला मोठी गळती; भाजपा कार्यकर्ते यांनी स्थानिक रहिवाशांशी केला संवाद!

0
47

मुख्याधिकाऱ्यांशी बोलून यावर त्वरित मार्ग काढणार : शैलेश बेर्डे, निलेश आखाडे यांनी स्थानिकांना दिला शब्द.

रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषद हद्दीमध्ये सहकार नगर येथे असलेली मोठी पाण्याची टाकी या टाकीला मोठी गळती लागली आहे. याचा फटका प्रभाग क्रमांक ५ व ६ मधील रहिवाशांना बसत आहे. या पाण्याच्या गळतीमुळे आजूबाजूच्या परिसरातील सहकार नगर, राजेंद्र नगर, नूतननगर, साळवी स्टॉप, नरहर वसाहत, विश्वनगर, आंबेशेत, आनंद नगर, मारुती मंदिर परिसरातील लोकांना पाण्याच्या समस्याला अनेकदा तोंड द्यावे लागते. अतिशय कमी दाबाने पाणी मिळते. याचे कारण काय हे शोधताना भाजपा जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पदाधिकारी यांनी याबाबत पाठपुरावा सुरू केला आहे.

अनेक स्थानिकांनी या पाण्याच्या टाकीबाबत सांगितले. भाजपा शहर खजिनदार शैलेश बेर्डे, आयटी जिल्हा संयोजक निलेश आखाडे, भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी सायली बेर्डे, जिल्हा पदाधिकारी नितीन गांगण, ओबीसी मोर्चा महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ता रूमडे आदींनी रात्री आठच्या सुमारास सहकार नगर येथे असलेल्या पाण्याच्या टाकीला अचानक भेट दिली. व तेथील वस्तुस्थितीची पाहणी केली आणि आजूबाजूच्या रहिवाशांशी संपर्क साधत त्यांच्याशी याबाबत चर्चा केली. प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा देखील टाकीतून लाखो लिटर पाणी वाया जात होते. या टाकीला गेले अनेक वर्ष गळती लागली असून दररोज हजारो लिटर पाणी यातून वाया जात असल्याचे समोर आले आहे. अनेकदा मागणी करून देखील रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे असे तेथील स्थानिकांनी सांगितले.

तेथील स्थानिक श्री आंबर्डेकर, श्री हर्चेकर, श्री कुवर सर, श्री भाटवडेकर, श्री बेहेरे सर, जोशी सर, आदींनी तेथील समस्यांचा पाढा भाजपा पदाधिकाऱ्यांसमोर वाचला. उपस्थित भाजपा पदाधिकारी श्री शैलेश बेर्डे, निलेश आखाडे नितीन गांगण यांनी याबाबत आम्ही त्वरित उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करणार असून लवकरच याबाबत ठोस उपाय योजना करावी अशी मागणी करीत आहोत असे तेथील उपस्थितांना सांगितले. रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहत त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी भाजपा पदाधिकारी आणि तेथील स्थानिक रहिवासी यांनी केली आहे. मुख्याधिकाऱ्यांशी बोलून यावर त्वरित मार्ग काढणार असल्याचे शैलेश बेर्डे, निलेश आखाडे यांनी स्थानिकांना बोलताना सांगितले. भाजपचे भटके विमुक्त जिल्हाध्यक्ष हे प्रभागातील नागरिकांच्या समस्या कायमच मांडत आले असून अनेक समस्या सोडविण्यात त्यांनी यश मिळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here