रत्नागिरी:- पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेसाठी मुंबई विद्यापिठाच्या मुलींच्या खो-खो संघाच्या प्रशिक्षिकपदी रत्नागिरीतील राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांची निवड झाली आहे तसेच विद्यापिठाच्या संघात रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या तिघींचा समावेश आहे.
राजस्थान बनसरा येथे १६ ते १९ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेत मुंबई विद्यापिठाचा मुलींचा संघ सहभागी होणार आहे. त्या संघाच्या प्रशिक्षकपदी रत्नागिरीतील चवंडे यांची निवड झाली आहे. चवंडे यांनी यापूर्वी महाराष्ट्र खो-खो मुली संघाचे प्रशिक्षकपद भूषवताना सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्यामध्ये तीनवेळा महिला संघ, दोनवेळा ज्युनिअर संघाचे तर दोन खेलो इंडिया स्पर्धेत प्रशिक्षक म्हणून त्यांनी भूमिका बजावली आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील त्यांच्या अनुभवामुळे त्यांची मुंबई विद्यापिठाच्या मुलींच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
मुंबई येथे 13 डिसेंबरपासून मार्गदर्शन शिबिर होणार असून, त्यानंतर ते राजस्थानला रवाना होणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जाणाऱ्या विद्यापीठाच्या या संघात रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय खो-खोपटू पायल पवार, श्रेया सनगरे व साक्षी डाफळे यांचा समावेश आहे.