प्राचीन कोकण म्युझियममध्ये कोकण चित्र प्रदर्शन पर्यटकांसाठी हे आकर्षणाचे केंद्र.

0
7

प्राचीन कोकणच्या विसाव्या वर्धापनदिनाचे औचित्य.

रत्नागिरी:- गणपतीपुळे येथील प्राचीन कोकणच्या २० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्राचीन कोकण म्युझियममध्ये कोकण चित्र प्रदर्शन तयार करण्यात आले आहे. यामध्ये २ फुट x 3फुट च्या पेंटींग पासून 4 फूट x 8 फुट अशा भव्य चित्रांचा समावेश आहे . या चित्रांमधून कोकणचे सण , समारंभ , चित्रकथी सारख्या पारंपरिक कला , व्यवसाय यांचे सुंदर दर्शन घडविले आहे.

सिंधुदुर्ग मधील प्रसिद्ध चित्रकार वेंगुर्लेकर आणि मंडणगड (रत्नागिरी ) येथील चित्रकार प्रणव फराटे यांनी ही चित्रे साकारली आहेत. पर्यटकांसाठी हे प्रदर्शन आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. गणपतीपुळे येथील प्राचीन कोकण म्युझियम हे महाराष्ट्रातील ओपन एअर म्युझियम आहे. गणपतीमुळे येथे तीन एकर जागेवर ५०० वर्षांपूर्वीच्या कोकणी खेड्याची इतिहास , परंपरा , संस्कृती , वेशभूषा दाखवणारे संपूर्ण गावच वसविण्यात आले आहे . हिरव्यागार देवराईमध्ये पुरातन जांभ्या दगडाच्या पाखाडीतून पक्षांचा किलबिलाट ऐकत आपण गावात प्रवेश करतो. म्युझियमची स्वागतिका प्रत्येक ग्रुपबरोबर म्युझियम दाखविण्यासाठी आपल्या येतात .

मराठी, हिंदी आणि इंग्रजी मध्ये कोकणचा इतिहास उलगडून दाखवतात. उतरत्या छपरांची घरे , लाल चुटूक मातीच्या वाटा , झूळू झूळू वहाणारे पाटाचे पाणी अशा वातावरणात आपले मन इतिहासात अगदी रमून जाते . इथे 140 पेक्षा जास्त प्रकारची औषधी व दुर्मिळ वनस्पतींचा संग्रह आहे. वाटेत बकुळीच्या फुलांचा सडा तर कधी सुरंगीच्या फुलांचा दरवळ येतो. इथले स्पाईस गार्डन काळीमीरी , बुशमीरी , दालचीनी , तमालपत्र , लवंग , वेलची , ऑलस्पाईस , त्रिफळ , जायफळ अशा विविध मसाल्याच्या झाडांनी समृद्ध आहे.

गणपतीपुळे प्राचीन कोकण येथील हस्तकला विक्री केंद्रामध्ये तर कोकणातील शेकडो प्रकारच्या हस्तकौशल्याच्या वस्तू आहेत. प्राचीन कोकण येथे मैत्रेयी हँडीक्राफ्ट नावाने लाकडी खेळणी बनवली जातात. शंखप्रदर्शनाचे सर्वांत मोठे आकर्षण आहे. प्राचीन कोकण येथे १६० पेक्षा जास्त प्रकारच्या शंखांचे प्रदर्शन असून त्यामध्ये पुजेचे शंख , दुर्मिळ शंख , शोभेचे शंख तसे दोन फुट लांब असे विविध शंख पहायला व खरेदी करायला मिळतात प्राचीन कोकण म्युझियम हे कोकणातील सर्वांत लोकप्रिय म्युझियम असून लाखो पर्यटक दरवर्षी येथे भेट देतात अशी माहिती श्री वैभव सरदेसाई, सौ. स्वरुपा सरदेसाई यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here