ठाकरे शिवसेनेचे शहर संघटक प्रसाद सावंत यांचा जिंदाल कंपनीला सज्जड इशारा.
रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड येथे आज घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मिळेल त्या खासगी वाहनाने विद्यार्थ्यांना उपचारासाठी जयगडहून रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले जात होते. मात्र माणुसकीच्या नात्यानेही जिंदाल कंपनीने अत्यवस्थ विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यासाठी गाड्यांची उपलब्धता करून दिल्या नाहीत. उलट दुर्घटना घडल्यानंतर कंपनीने शाळेतील शिक्षकांबरोबर हुज्जत घालत आपला या घटनेशी संबंध नसल्याचे सांगून हात वर केले. कंपनीने हे खालच्या पातळीचे कृत्य केले आहे. त्यांना जर एवढा माज आला असेल तर तो उतरवला जाईल, असा सज्जड इशारा ठाकरे शिवसेनेचे शहर संघटक आणि माजी युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद सावंत यांनी दिला आहे.
जयगड येथील जिंदाल कंपनीतून वायुगळती झाल्यामुळे नजीकच असणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना याचा त्रास झाला. तब्बल ६० विद्यार्थी बाधित झाले असून त्यांना उलटी, मळमळ आणि चक्कर याचा त्रास सुरू झाला. विद्यार्थ्यांची प्रकृती खालावत चालल्याने काही विद्यार्थ्यांना उपचारासाठी वाटद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. तसेच अर्ध्याहून अधिक मुलांना उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मिळेल त्या खासगी वाहनाने विद्यार्थ्यांना रुग्णालयात आणले जात होते. या सर्व प्रकरणानंतर जिंदाल कंपनीने हात वर केले असून आपला या घटनेची संबंध नसल्याचे सांगितले. तसेच पालकांशी हुज्जतही घातली.
माणुसकी म्हणून देखील विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यासाठी वाहनांची उपलब्धता करून दिली नाही. कंपनीने दाखवलेल्या या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. कंपनीला जर एवढा माज आला असेल, तर तो आमच्या पद्धतीने उतरवला जाईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे शहर संघटक आणि माजी युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद सावंत यांनी दिला आहे. दरम्यान, शहर संघटक प्रसाद सावंत यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस करतनाच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीची मदतही पुरवली.