व्याख्याने, खारफुटी जंगल, किनारा सहल.
रत्नागिरी:- सलग तिसऱ्या वर्षी जानेवारीत आसमंत सागर महोत्सवाचे आयोजन केले आहे. व्याख्याने, खारफुटी, सागरकिनारा सहल, खाडीमध्ये बोटीतून भ्रमंती असे विविध कार्यक्रम यात होणार आहेत. मुख्य कार्यक्रम शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. तसेच जागतिक दर्जाचे मरिन बायोलॉजिस्ट, तज्ज्ञ अभ्यासक यात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजक आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आसमंत सागर महोत्सव ९ ते १२ जानेवारी २०२५ असे चार दिवस साजरा होणार आहे. दरवर्षीच्या कार्यक्रमापेक्षा यावर्षीच्या कार्यक्रमात वैविध्य असणार आहे. या वर्षी पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयांतील विद्यार्थी सक्रिय सहभाग घेणार आहेत. महोत्सवामध्ये गोगटे- जोगळेकर महाविद्यालय, दापोली कृषी विद्यापीठाचे शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (गोवा), गोखले इन्स्टिट्यूट, सेंटर फॉर ससस्टेनेबल डेव्हलपमेंट (पुणे), इकॉलॉजिकल सोसायटी (पुणे), कोस्टल कॉन्झर्वेशन फौंडेशन (मुंबई) यांचा तांत्रिक सहभाग आहे.
नंदकुमार पटवर्धन यांनी सांगितले की, मानवी उत्क्रांतीत सागरांचे महत्व अपार आहे. आधुनिक अर्थव्यवस्था आणि मानवी स्वास्थ्य यात ही सागरांचे मोठे योगदान आहे. पण या गोष्टीची जाणीव सर्वसाधारण माणसांना असतेच असे नाही. किंबहुना, समुद्रापासून दूर नागरिकांना तर याची माहिती सुद्धा नसते. सागरी परिसंस्था आणि त्याचे महत्व सामान्य नागरिकांपर्यंत नेणे, आणि त्यातून संवर्धन कार्याची प्रेरणा देणे, याच ध्येयातून तीन वर्षांपूर्वी सागर महोत्सव सुरू झाला. गेल्या दोन वर्षात सुमारे १० हजार लोकांपर्यंत आम्ही पोचलो, त्यातून अनेक शाळा-कॉलेजनी प्रेरणा घेऊन कामे हाती घेतली, यातच आम्ही यश मानतो. सागराशी मैत्री साधत आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन त्याचे जतन, संवर्धन करण्यासाठी तीन वर्षे प्रयत्न करत आहे. सागर आणि त्याच्या भोवती असलेल्या परिसंस्थेचे जतन किती महत्वाचे आहे, हे समजावून देण्यात यश मिळत आहे.
समुद्रावर आधारित क्षेत्रे
मत्स्यपालन, शिपिंग, पर्यटन, खोल समुद्रातील खाणकाम, ऑफशोअर ऊर्जा संसाधने, सागरी संशोधन, महासागर संवर्धन आणि महासागर विज्ञान यासह क्षेत्रे महासागरावर आधारित आहेत. भारतासाठी निलक्रांती म्हणजे आर्थिक संधींचा एक विशाल महासागर जो उपजीविका निर्माण करण्यात आणि टिकवून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. १२ प्रमुख आणि २०० लहान बंदरांसह नऊ किनारी राज्ये, चार केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या ७५०० किमी लांबीच्या किनारपट्टीवर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) अंदाजे ४ टक्के योगदान आहे. त्यामुळे सागराचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे नंदकुमार पटवर्धन यांनी सांगितले.