संगमेश्वर तालुक्यात गणपती बाप्पाला वाजत-गाजत भावपूर्ण निरोप!

0
71
संगमेश्वर तालुक्यात गणरायाला वाजत-गाजत भावपूर्ण निरोप.
प्रातिनिधिक छायाचित्र.

संगमेश्वर:- तालुक्यात ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढत गौरी गणपतींना आज गुरूवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ च्या जयजयकारात लाडक्या बाप्पाला गणेशभक्तांनी निरोप दिला. यावेळी वरूणराजाची कृपा पहावयास मिळाली.

तालुक्यात गणेशचतुर्थीच्या दिवशी लाडक्या गणरायाचे घरोघरी आगमन झाल्यानंतर प्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाचे घरोघरी आगमन झाल्यानंतर पाच दिवस भक्तीभावाने पूजाअर्चा करण्यात आली. या कालावधीत अनेक ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. दररोज आरती, भजन, जाखडी, महिलांचे टिपरी नृत्य असे कार्यक्रम झाले. यामुळे तालुक्यातील वातावरण भक्तीमय झाले होते. घरोघरी आरत्यांचे सूर घुमत होते. पाच दिवस गणरायाची भक्तीभावाने सेवा करण्यात आल्यानंतर सहाव्या दिवशी म्हणजेच गुरूवारी लाडक्या बाप्पाला गौरीसह जड अंतकरणाने निरोप देण्यात आला.

गणेश विसर्जन करताना संगमेश्वर तालुक्यातील गणेशभक्त.

गुरूवारी विसर्जन दिवशी अनेक ठिकाणी दुपारी ३ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुका निघाल्या. ढोल-ताशांच्या गजरात बेंजोच्या तालावर नाचत वाजत-गाजत लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. विसर्जनस्थळी मिरवणुका आल्यानंतर बाप्पाची आरती करण्यात आली. यानंतर लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला. तालुक्यातील देवरूख येथील सप्तलिंगी नदीपात्रात, संगमेश्वर येथील शास्त्री व सोनवी नदी, साखरपा येथील काजळी नदी, आरवली, माखजन येथील गडनदी व असावी नदी, आंगवली पंचक्रोशीतील बावनदी, सोनवडे पंचक्रोशीतील गडगडी नदीपात्रात तसेच अन्य ठिकाणी त्या-त्या छोट्या ओढ्यांवरील डोहात गणरायाचे विसर्जन करण्यात आले. देवरूख, संगमेश्वर व साखरपा येथे विसर्जनावेळी पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here