रत्नागिरी:- सोमेश्वर येथील सोमेश्वर शांतीपीठ, विश्वमंगल गो शाळेमध्ये विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी (ता. १२) सकाळी ८.०० ते १०.०० या वेळेमध्ये सोमेश्वर येथील गोशाळेत कार्यशाळा होईल. यात मुंबईतील तज्ज्ञ विक्रांत वाड हे गो कास्ट, गो पावडर व गो फिनेल याविषयाची माहिती देऊन हे उत्पादन तयार करण्याची सोपी पद्धत शिकवणार आहेत.
पंचगव्यापासूनच्या विविध वस्तू तयार करण्याचा विक्रांत वाड यांना गाढा अनुभव आहे. त्याचप्रमाणे स्मिता वेंगुर्लेकर याही या कार्यशाळेमध्ये निसर्गोपचार तज्ञ म्हणून सहभागी होणार आहेत. महिलांच्या विविध आजारांवर पंचगव्याद्वारे कोणते उपाय करता येतील, याची गेली वीस वर्ष ते त्या माहिती देत आहेत. या संदर्भातल्या कार्यशाळाही आयोजित करत आहेत.
रत्नागिरी शहर परिसरामध्ये ज्या भटक्या गायी, गुरे वासरे फिरत आहेत. यामुळे रत्नागिरीकरांना होणारा त्रास व मुक्या प्राण्यांचे होणारे हाल यामधून सुटका होण्यासाठी गेली वर्षभर रत्नागिरी जवळील सोमेश्वर गावी सोमेश्वर शांतीपिठामार्फत गोशाळा चालवली जात आहे. या गोशाळेमध्ये आता ५७ गायी- वासरे आहेत. रत्नागिरीकर दर रविवारी या गोशाळेमध्ये एकत्र येतात व श्रमदानाचे काम करतात. विविध व्याख्याने या गोशाळेमार्फत राबवली जातात. त्याचप्रमाणे विविध कार्यशाळांचे आयोजन या गोशाळेमार्फत केले जाते.
गुरुवारी होणाऱ्या कार्यशाळेमध्ये जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सोमेश्वर शांतीपिठाचे अध्यक्ष राजेश आयरे यांनी केले आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. फोन नं. 8999424706 किंवा 84594 93911 यावर पूर्वनोंदणी करावी.