रत्नागिरी:- पाचव्यांदा रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले आमदार उदय सामंत यांच्या सुक्ष्म नियोजन आणि उत्तम राजकीय डावपेचाबद्दल भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शाब्बासकी दिली. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीच्या १५ पैकी १४ जागा निवडून आणण्यात उदय सामंतांचा सिंहाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार देवेंद्र फडणवीसांनी काढले.

सलग पाचवा विजय नोंदवल्यानंतर आमदार उदय सामंत यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी विधानसभा निवडणुकीबाबत दिलखुलास चर्चा केली. विरोधकांनी शासनाच्या विरोधात निर्माण केलेले मत बदलून जनमत आपल्या बाजूने वळवण्यात महायुतीला यश आले. कोकणातील एकूण १५ पैकी १४ जागांवर विजयी मिळवत महायुतीने घवघवीत यश मिळवले.

निवडणुकीतील राजकीय गणिते बांधण्यात, वातावरण महायुतीच्या बाजूने फिरवणे, मतदान वळवण्यात सामंत यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगत फडणवीस यांनी गौरव केला. या वेळी सामंत यांचाही सत्कार करण्यात आला. त्या वेळी पूर्ण कोकणामध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने काम केल्याबद्दल सामंत यांनीही देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.