लेखन:- सुमित्र माडगूळकर ✍🏾
गदिमांच्या आयुष्यात घडलेल्या काही गंमतशीर गोष्टी,त्यांच्या काही सवयी ज्या तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील!.
गदिमांना त्यांच्या मित्रांना गंमतशीर नावांनी हाक मारण्याची सवय होती,नावांची गंमत करणे हा त्यांचा आवडता छंद असायचा. मधुकर कुळकर्ण्यांना “पेटीस्वारी”,राम गबालेंना “रॅम् ग्याबल”, वामनराव कुळकर्ण्यांना “रावराव”.पु.भा.भाव्यांना ‘स्वामी’,पु.ल.देशपांड्यांना ‘फूल्देस्पांडे’.राजा मंगळवेढेकर यांना ‘मंगळ’,’राजा ऑफ मंगळवेढा’.पंचवटीत येणारा नवखा असेल तर ‘या’ असे भारदस्त आवाजात स्वागत व्हायचे सलगीच्या लोकांना ‘क्यो गुरू’,’काय माकडेराव?’,’कसं काय फास्टर फेणे?’ असे स्वागत ठरलेले असायचे.अनेक मित्रांची अशी वेगवेगळी नावे ठरलेली असायची.
पु.भा.भावे म्हणजे गदिमांचे खास मित्र तेही गदिमांना काही नावाने हाक मारत गम्पटराव, बुवा, स्वामी, डेंगरु, लाल डेंगा, वुल्फ ऑफ माडगूळ, चित्तचक्षुचमत्कारिक! ..आणि गदिमां कडून चक्क त्या नावांस प्रतिसाद ही मिळत असे!.
त्या काळात जशी गदिमा-बाबुजी जोडगोळी प्रसिद्ध होती तशी त्याच्या आधी एक त्रिकुट प्रसिद्ध होते ‘लाड-माड-पाड’ ..लाड म्हणजे गीतरामायणाचे जनक सिताकांत लाड,माड म्हणजे ग.दि.माडगूळकर व पाड म्हणजे पु.ल.देशपांडे!.
गदिमा आनंदात असले कुठले काम किव्वा गोष्ट मनासारखी झाली किव्वा आवडली तर त्यांचे वाक्य असे ‘गुड रे,गुड गुड गुड गुड गुड गुड….’, तर कधी ‘बेस्टम बेस्ट आणि कोपरानं टूथपेस्ट’!.
एकदा गदिमांचा संबंध कोल्हापूरच्या ‘उत्तमराव शेणोलीकर’ नावाच्या गृहस्थांशी आला,त्यांना हे नाव इतके आवडले की त्यांनी त्या नावाचे रूपांतर ‘उत्तमराव’ –> ‘बेष्टराव’ शेणोलीकर असे करून टाकले,घरात कुठला चांगला पदार्थ झाला की त्यांचे पेट वाक्य ठरलेले असे ‘एकदम ‘बेष्टराव शेणोलीकर’ झाला आहे!’.
गदिमांना एक फोन आला त्यांनी स्वतःच उचलला,समोरून आवाज आला मला ग.दि.माडगूळकर यांच्याशी बोलायचे आहे मी ‘सत्येन टण्णू बोलतो आहे’,गदिमांना वाटले कोणीतरी गंमत करतो आहे त्यांनी हे आडनाव ऐकले नव्हते ते लगेच उत्तरले “मी ‘माडगूळकर अण्णू बोलतो आहे,बोला!'”.
गदिमांनी मराठी चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान मिळवले होते,ते इतके व्यस्त असत की सकाळी एक, दुपारी एक व रात्री एक अश्या तीन चित्रपटांच्या कथा ते दिवसभरात लिहायला बसत.कधी कधी त्यात साहित्यिक कार्यक्रम असत,ते १२ वर्षे आमदार होते त्यासंबंधित कार्यक्रम असत,ते तयार होत,जाणे आवश्यक असे पण कंटाळले की तयार होऊन म्हणत ‘आम्ही नाय जायचा’,नाही जायचा की अजिबात नाही जायचा… मग अगदी मुख्यमंत्रांचीही भेट ठरलेली का असेना!.
बऱ्याच वेळा सकाळी उठल्यापासून मित्रांच्या बैठकी रंगत,विद्याताई मधूनच राहिलेल्या आंघोळीची आठवण करत,शेवटी गदिमा नाखुषीने उठता उठता म्हणत ‘पाच मिनिटात आंघोळीच्या मिशा लावून येतो!’,आंघोळीच्या मिशा हे एक गंमतशीर प्रकरण होते.एक गाणे होते गौळण खट्याळ कृष्णाला यमुनेच्या काठावर लाडिक रागाने म्हणत असते ‘आंघोळीच्या मिषाने भिजविलेस अंग..’.पण एकदा गदिमांच्या नेम्याला (नेमीनाथ उपाध्ये उर्फ पुणे आकाशवाणीचे ‘हरबा’) प्रश्न पडला की ‘आंघोळीच्या मिशा’ कसल्या?.आणि तेव्हा पासून गदिमा ‘आंघोळीच्या मिशा लावू का?’,’आंघोळीच्या मिशा लावून टाकतो म्हणजे सुटलो’ असेच स्नानाच्या बाबतीत भाषा वापरत असत.
गदिमांचे एक मित्र होते ‘बाळ चितळे’ नावाचे,त्यांची एक वेगळीच तऱ्हा होती सगळ्यानं सारखे न करता वेगळे काहीतरी करायचे,उदा.सगळे जण हॉटेल मध्ये गेले आहेत व सगळ्यांनी डोसा मागविला तर हे मिसळ मागविणार!,अगदी सगळे करतील त्याच्या बरोबर उलटे करायचे यात त्यांचा हातखंडा होता त्यामुळे आमच्या घरात कोणी असे वेगळे वागायला गेला की त्याला ‘बाळ चितळे’ ही पदवी मिळत असे!.
गदिमांना कधी कधी छोटे अगदी सर्दी सारखे आजार पण सहन होत नसत,मग अगदी शिंक आली तरी त्यांचे मरण वाक्य सुरू होई ‘मरतय की काय आता!’,बिलंदर पणा हा त्यांच्यात ठासून भरलेला होता,हे सर्व गुण जन्मजात माडगूळच्या मातीतून आलेले होते,एकदा माडगूळ गावात सभा झाली,सभेनंतर एकाने टेबल-खुर्ची-सतरंजी या सकट अध्यक्ष ,वक्ते यांचे आभार मानले.ते आभाराचे भाषण सीतारामबापू नावाच्या सरपंचाना इतके आवडले की पुढे बोलताना बापू आभार शब्दाशिवाय बोलेनासेच झाले.अगदी त्यांना कोणी सांगितले की अमक्या तमक्याला मुलगा झाला तर ते चटकन म्हणायचे ‘म्हणजे हे आभार मानायचंच काम झालं!’,कोणी बातमी दिली की कडब्याच्या गंजीला आग लागली तर बापू झटक्याने म्हणणार ‘म्हणजे हे आभार मानायचंच काम झालं!’,शेवटी सगळ्या गावाने त्यांचे नाव ‘आभार सीताराम’ असे ठेवले होते.तर सांगायचे असे की हे विनोदी गुण बहुतेक गदिमांना आपल्या गावाकडच्या मातीतून व माणसांकडून उपजतच मिळाले होते.
गदिमांच्या धाकट्या भावाचे लग्न होते,वऱ्हाड घेऊन मंडळी लग्नघरी गेली,नवरा मुलगा बघायला नवरीच्या मैत्रिणींची पळापळ सुरू झाली,नवरा मुलगा कुठला हे कोणालाच माहीत नव्हते,एक कोणतरी मैत्रीण मोठ्याने गावाकडच्या टोन मध्ये म्हणाली ‘कोन्ता ग कोन्ता?’,झालं पुढचे अनेक दिवस कुठल्याही बाबतीत चौकशी करायची असेल तर गदिमांचे वाक्य तयार असे ‘कोन्ता ग कोन्ता?’,..एखादे वाक्य दुसऱ्याला कंटाळा येई पर्यंत लावून धरणे हे आम्हा माडगूळकरांचे खास वैशिष्ट्य!.
राजा निलकंठ बढे उर्फ कवि-गीतकार राजा बढे यांची एक कविता गदिमांच्या वाचनात आली सुंदर कविता होती पण खाली लेखकाचे नाव होते ‘रा.नि.बढे’ आधी गदिमांना लक्षात येईना की हे कोण लेखक,मग आठवले की अरे हे तर आपले ‘राजा बढे’,पुढे त्याच सुमारास राजा बढे पंचवटीत आले,त्या वेळी गजाननराव वाटव्यांचे ‘राधे तुझा सैल अंबाडा’ हे गाणे गाजत होते त्या चालीवर त्यांना बघताच गदिमा गमतीदार पणे मान डोलावत म्हणू लागले…
“कुणी ग बाई केला? कसा ग बाई केला?
आज कसा राजा बढे,रानी बढे झाला?”
एकदा गदिमांच्या एका कोल्हापुरी मित्राने त्यांना चक्क व्यवसाय करायची गळ घातली,साधासुधा नाही तर चक्क पोल्ट्री फार्म काढायचा म्हणून,मराठी चित्रपट सृष्टीत तसा पैश्याचा खळखळाटच असायचा,त्यांनी असे काही चित्र रंगविले की गदिमा त्याला तयार झाले,घरात बऱ्याच चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर मराठी माणसाने एक मोठा उद्योजक होण्याची स्वप्ने पहायला सुरवात केली.नशिबाने ‘ग.दि.माडगूळकर पोल्ट्री फार्म’ असे नाव नाही दिले पण त्या काळात गदिमांनी चक्क १०,००० रुपये तरी त्या गृहस्थांना दिले असतील.५-६ महिने असेच गेले असतील गदिमा आपल्या कामात व्यस्त होते,श्रावण महिन्यातील मुहूर्त काढून हे गृहस्थ एकदा ३-४ डझन अंडी घेऊन घरी आले,’अण्णा ही आपल्या फार्म मधली अंडी!’.श्रावण असल्यामुळे सर्वच्या सर्व अंडी नोकर चाकरांना देऊन टाकावी लागली!.असेच पुढे काही महिने गेले व गृहस्थ रडत आले की ‘अण्णा अमुक तमुक रोग झाला व सर्व कोंबड्या मरून गेल्या!’.झालं गदिमांची व्यावसायिक होण्याची स्वप्ने धुळीस मिळाली व महाराष्ट्र एक मोठ्या पोल्ट्री उद्योजकाला मुकला!.
गदिमांना गीतरामायणामुळे ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणत असत,शेवटच्या काळात ते कर्करोगाने आजारी होते,त्यांच्या हातून फारसे लिखाण होत नव्हते,म्हणून ललित मासिकात त्यांनी स्वतः बद्दलच बिंगचित्र लिहिले होते,गदिमांच्या हातात कुर्हाड घेतलेल्या व्यंगचित्राखाली लिहिले होते..
“कथा नाही की कविता नाही,नाही लेखही साधा
काय वाल्मिके,स्विकारिसी तू पुन:श्च पहिला धंदा?”
अश्या कितीतरी गंमतशीर गोष्टी,प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडले होते,गदिमा हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते अगदी हिमनगासारखे……त्यांच्यात एक बिलंदर खेडूत दडलेला होता,एक सुसंस्कृत प्रकांड पंडित दडलेला होता,एक सच्चा राजकारणी दडलेला होता…..काय नव्हते…पण सगळ्यात महत्वाचा म्हणजे एक खरा माणूस दडलेला होता,कधीकधी वाटते आपल्यासमोर त्यांची जी बाजू आली त्याच्या हजारो पट ते आजही पडद्याआड आहेत….अगदी त्यांच्या शताब्दीतसुद्धा…